वकिलाच्या तक्रारीनंतर आरोपी ताब्यात

नागपूर : करोनासंदर्भात मुस्लीम समुदायाबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह टिपणी करणाऱ्याविरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. अशोक जेठा (३१) रा. चंदननगर असे आरोपीचे नाव आहे.

अ‍ॅड. मीर नगमान अली रा. अवस्थीनगर चौक यांच्या तक्रारीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हा अ‍ॅड. मीर यांच्यासोबत एलएलबीला होता. एलएलबीची पदवी संपादन केल्यानंतर अ‍ॅड. मीर यांनी वकिली करायला सुरुवात केली तर जेठा  व्यवसाय करतो. तेव्हापासून ते एकमेकांचे फेसबुक मित्र आहेत. दरम्यान ८ एप्रिलला अशोक जेठा याने मध्यरात्री  फेसबुकवर मुस्लीम समुदाय व मक्का मदीना या पवित्र स्थळासंदर्भात आक्षेपार्ह टिपणी केली. जगात करोनाचा संसर्ग सुरू असून मुस्लीम समुदायाला त्याच्याशी जोडणारे ही टिपणी होती. हा प्रकार लक्षात येताच अ‍ॅड. मीर यांनी आपले वकील मित्र आसिफ सिद्दीकी, सोहेलुद्दीन शेख आदींसोबत चर्चा केली व पोलिसांत तक्रार दिली. अशोक जेठा हा मुस्लीम समुदायाबद्दल आक्षेपार्ह टिपणी करण्याच्या सवयीचा असून आता केलेली टिपणी अतिशय घृणास्पद असल्याचे या तक्रारीत नमूद होते. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी अशोक जेठा याच्यासह आनंद दवारकांनी आरंग  लिखित कुमार, राजू तुवानी रा. छत्तीसगड,  रोशन काळमेघ रा. मुंबई यांच्याविरुद्ध  भादंवि  आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश ठाकरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जेठा याला ताब्यात घेतले असून आक्षेपार्ह पोस्ट कुरुक्षेत्र रहिवासी दीपक चहर याने तयार केले. इतरांनी ते प्रसारित (शेअर) केल्याची माहिती दिली.