03 March 2021

News Flash

आठ मंगल कार्यालयांवर कारवाई 

लग्नसोहोळ्यातील गर्दी भोवली, ३७ हजार रुपयांचा दंड वसूल

(संग्रहित छायाचित्र)

लग्नसोहोळ्यातील गर्दी भोवली, ३७ हजार रुपयांचा दंड वसूल

नागपूर : शहरातील करोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यात मंगळवारी शहरातील विविध भागातील  विवाह समारंभात वऱ्हाडाच्या झालेल्या गर्दीमुळे महापालिकेच्या उपद्रवी शोध पथकाने मंगळवारी आठ मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून ३७ हजारांचा दंड वसूल केला. एकीकडे लग्न समारंभाचा आनंद साजरा केला जात असताना मंगलाष्टके आटोपताच लोकांना गर्दी करू नका, मुखपट्टी , सॅनिटायझर लावा अशा सूचना दिल्या जात होत्या.

मंगळवारी वसंतपंचमीला लग्नांचा मुहूर्त असल्याने शहरातील विविध भागातील मंगल कार्यालयात विवाह समारंभाची धूम होती. दोन दिवस आधी महापालिकेने मंगल कार्यालये व लॉनला लग्न समारंभासाठी जारी केलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र मंगळवारी अनेक मंगल कार्यालयात उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे महापालिकेने मंगळवारी नियम मोडणाऱ्या मंगल कार्यालये व लॉन्सवर कारवाई सुरू केली. यात लक्ष्मीनगर झोनमध्ये पराते सभागृह, राधे मंगलम सभागृह, गोल्डन लिफ लॉन, साईबाबा सभागृह, धरमपेठ झोनमध्ये कुसुमताई वानखेडे सभागृह, नेहरूनगर झोनमधील जट्टेवार मंगल कार्यालय तसेच सतरंजीपुरामधील प्रीतम सभागृहाचा समावेश आहे.

या सर्व ठिकाणी लग्न समारंभासाठी जारी केलेल्या निर्धारित संख्येपेक्षा जास्त वऱ्हाडी आढळल्यामुळे त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला. मातृमंगल कार्यालयात सॅनिटायझर न ठेवल्यामुळे त्यांच्याकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. शहरात खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्यानगर, न्यू बिडीपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफरनगर आदी भागांत करोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी अधिक काळजी घेत सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी कुठलीही लक्षणे येण्याची वाट न पाहता जवळच्या चाचणी केंद्रात जाऊ न मोफत चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्यावतीने केले जात आहे.

सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांना २५ टक्के उपस्थितीची अट

वाढत्या संख्येच्या पाश्र्वभूमीवर शहरातील मंगल कार्यालये, विविध लॉन्स, मोकळ्या मैदानात होणाऱ्या कार्यक्रमांना २५ टक्के अथवा केवळ १०० लोकांच्या उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत.    सभागृहाने नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना पहिल्यांदा १५ हजार रुपये दंड, त्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्यास २५ हजार व त्यानंतर ५० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय सभागृह सील करण्याची तरतूद आहे. तसेच कार्यक्रमाच्या आयोजकाकडून नियमांचे पालन न केल्यास दहा हजार रुपये दंड  वसूल करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

दंड करताना दुजाभाव

सोमवारी नरेंद्रनगर येथील तुकाराम सभागृहावर कारवाई करताना मंगल कार्यालयाकडून पाच आणि ज्यांच्याकडे लग्न होते त्यांच्याकडून पाच हजार असे एकूण १० हजार रुपये दंड वसूल केला. मात्र दुसऱ्याच दिवशी मंगळवारी शहरातील आठ मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या उपद्रवी शोध पथकाने कारवाई करत केवळ मंगल कार्यालयाकडून पाच हजार दंड वसूल करण्यात आला. ज्यांच्याकडे विवाह समारंभ होता त्यांच्याकडून कुठलाही शुल्क दंड घेण्यात आला नाही. यामुळे हा कसला न्याय असा प्रश्न अनेक मंगल कार्यालय संचालकांनी उपस्थित केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:43 am

Web Title: action on eight wedding hall for violating covid 19 rules zws 70
Next Stories
1 शासकीय दंत महाविद्यालयातही करोनाचा उद्रेक!
2 आठ रुग्णालयांत करोना मृत्यूदर पंधरा टक्के!
3 ‘कोर्टात बघून घेईल’ म्हणणे धमकी नव्हे
Just Now!
X