महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये अधिकाऱ्यांची दालने स्थापन झाल्यानंतर उर्वरित इमारतीचे काम वर्षभरात पूर्ण होईल, असे जाहीर केल्यानंतर गेल्या काही दिवसात कंत्राटदाराचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष बघता इमारतीचे बांधकाम मात्र अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. महापालिकेच्या केंद्रीय कार्यालयात मागच्या भागात असलेल्या या नव्या इमारतीचा १८ कोटींचा प्रस्ताव असताना आता त्याचा खर्च ९० कोटींच्यावर पोहोचला असून, बांधकामासंदर्भात पुन्हा एकदा निविदा काढण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
सिव्हील लाईन्समधील महापालिकेच्या केंद्रीय कार्यालयाच्या मागच्या भागात २००९ मध्ये नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. २०१३ मध्ये पहिल्या मजल्याचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर महापालिका आयुक्तांसह उपायुक्तांची कार्यालये त्या भागात स्थानांतरित करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांशी संबंधीत कंत्राटदारांकडे या इमारतीचे बांधकाम असल्यामुळे त्यांच्याकडून त्यावेळी कामातील दिरंगाईबद्दल दंड वसूल करून त्यांच्याकडून काम काढून घेण्यात आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये याच बांधकामासाठी नव्याने निविदा मागविण्यात आल्या मात्र त्या निविदेचे काय झाले याची माहिती समोरच आली नाही. जुन्या इमारतीमध्ये असलेले आरोग्य, सामान्य प्रशासन, बांधकाम, जन्म मृत्यू नोंदणी , नगररचना, शिक्षण आदी विभाग नव्या इमारतीमध्ये स्थानांतरित करण्याचे निश्चित केले होते त्याप्रमाणे नव्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे निविदा काढण्यात आल्या होत्या मात्र ती प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. १८ कोटींचा प्रस्ताव असताना इमारत बांधकामाचा अवधी वाढल्याने त्याचाही खर्च वाढत गेला. आजपर्यंत ७५ कोटींचा खर्च इमारतीवर करण्यात आला असला तरी अनेक कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. महापालिकेचा महत्त्वाचा विभाग असलेल्या अग्निशमन विभागाला नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये स्वतंत्र कार्यालय देण्यात आले असले तरी ती जागा कमी पडत आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर या विभागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचत असताना अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते त्यामुळे आहे त्या ठिकाणी सुधारणा करण्यात यावी असा प्रस्ताव अग्निशमन विभागाने दोन वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाला दिला होता मात्र त्या प्रस्तावावर अजूनही निर्णय झाला नाही. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी नव्या इमारतीच्या उर्वरित मजल्यावर कामाची सुरुवात करणार असून, त्यासाठी पुन्हा एकदा निविदा काढणार असल्याची माहिती आहे. नवी प्रशासकीय इमारत २०१४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना आणखी किती दिवस वाट पहावी लागणार हे येणारा काळच ठरवेल.

नव्या प्रशासकीय इमारतीचे पहिल्या पाच माळ्याचे काम पूर्ण झाले असून, त्या ठिकाणी फर्निचर आणि अन्य सुविधा निर्माण करण्यासाठी वेळ लागणार आहे. पहिल्या माळ्यावरील काम जवळपास पूर्ण झाले आहे. लेखा विभागाचे कार्यालय पहिल्या माळ्यावर सुरू करण्यात आले आहे. येत्या दोन वर्षांत नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
– बंडू राऊत , स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका