अकोला ते खंडवा असा जंगलातून होणारा ‘मीटरगेज’ रेल्वेचा प्रवास ‘ब्रॉडगेज’ रेल्वेत रूपांतरित करण्याचा अट्टहास वादाच्या मार्गाने आणि परिणामी कायद्याच्या कक्षेत गेल्याने मेळघाटच्या भुरळ पाडणाऱ्या निसर्गसौंदर्यापासून पर्यटक वंचित झाले आहेत. सातपुडय़ाच्या पर्वत रांगांमधून धावणारी ‘मीटरगेज’ रेल्वे गेल्या अडीच वर्षांपासून बंद आहे.

उत्तर भारताला अगदी कमी अंतरात दक्षिण भारताशी जोडणारा अकोला-खंडवा हा रेल्वेमार्ग सहा दशकांपूर्वी तयार करण्यात आला. सातपुडय़ाच्या लक्षवेधक पर्वत रांगातून चढउतार करत आणि अनेक वळणे घेत यावरून मीटरगेज रेल्वे धावायला लागली होती. धुळघाट या गावाजवळून चढाव गाठण्यासाठी एका पहाडाला वळसा घालून हा रेल्वेमार्ग तयार झाला. पारिसरातील गावकऱ्यांसाठी ही रेल्वे अतिशय सोईस्कर होती. त्याहीपेक्षा सातपुडा पर्वतरांगा आणि मेळघाटचे निसर्गसौंदर्य त्यातून दिसून येत असल्याने निसर्गसौंदर्याचा हा मिलाफ बघण्यासाठी खास पर्यटक येत होते. या मार्गावरून दिवसाला केवळ चार आणि अतिशय संथगतीने जाणाऱ्या गाडय़ा पर्यटकांसाठी निसर्ग पर्यटनाचा महत्त्वाचा स्रोत ठरल्या. या मीटरगेज रेल्वेचा ५१ किलोमीटरचा मार्ग जंगलातून तर ३८ किलोमीटरचा मार्ग वन अभयारण्यातून जातो. या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेच्या गती आणि कमी संख्येमुळे वन्यजीवांसाठी ते इतके जीवघेणे नव्हते. याच मार्गावरील अकोला-हैदराबाद मार्ग ब्रॉडगेज आहे. भारतातील जवळजवळ सर्वच रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित होत असताना या मार्गाचादेखील ब्रॉडगेजसाठी विचार सुरू झाला. वन्यजीवप्रेमींनी त्याला कडाडून विरोध केला. कारण जंगलातून ब्रॉडगेजचे रूपांतर झाले तर या मार्गावरून चारच्या ऐवजी ४० आणि दुप्पट वेगाने रेल्वे जातील. वन्यप्राण्यांसाठी तो कर्दनकाळ ठरला असता. ब्रॉडगेज करायचेच तर जे जंगलाच्या बाहेरून करा. कारण त्यातून रेल्वेने अनेक गावेदेखील जोडली जाणार होती. मात्र, जंगलातूनच ब्रॉडगेजचा अट्टहास असल्याने सरकार विरेाधात स्वयंसेवी असा लढा उभा झाला. त्यातून तोडगा निघाला नाही आणि प्रकरण न्यायालयात गेले. यादरम्यान सरकारने ब्रॉडगेजचे काम सुरू केले. अकोट, हिवरखेडपर्यंत ते काम पूर्णही झाले आहे, पण न्यायालयात प्रकरण असल्याने आता काम थांबले आहे. यादरम्यान ही मीटरगेज गाडीदेखील डिसेंबर २०१६ पासून बंद ठेवण्यात आली आहे. देखभालीअभावी रेल्वेचे रूळ खराब होत आहेत. रेल्वेस्थानकाच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आले असून कर्मचारी इतरत्र हलवण्यात आले आहेत. न्यायालयातून अंतिम निर्णय होईपर्यंत मीटरगेज रेल्वे सुरू ठेवायला हवी होती, असे या परिसरातील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ही रेल्वे बंद करण्यात आल्यामुळे त्यांना दळणवळणासाठी समस्या निर्माण होत आहेत. बस किंवा खासगी वाहनांचा आधार त्यांना घ्यावा लागत आहे.

..वन्यजीवप्रेमींचा ब्रॉडगेजला विरोध

अकोला-खंडवा रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाल्यास वन्यजीवांच्या अपघातासाठी तो कारणीभूत ठरेल. या परिसरात वाघ, बिबटे, अस्वल, नीलगाय, सांबर, चौसिंगा, चिंकारा असे अनेक वन्यप्राणी आहेत. त्यामुळेच वन्यजीवप्रेमींनी ब्रॉडगेजला विरोध केला होता. निर्णय अधांतरी असल्याने ३१ डिसेंबर २०१६ पासून ही रेल्वे एकाच ठिकाणी उभी आहे. १९५५ साली या रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले होते. त्यानंतर जानेवारी १९६१ मध्ये मेळघाटातून ही रेल्वे सुरू झाली.

‘हेरिटेज’ म्हणून बघा

ब्रॉडगेजचा निर्णय होईस्तोवर मीटरगेज रेल्वे पूर्णपणे बंद करण्याऐवजी सुरू ठेवता आली असती. किमान आकोट ते मोहूपर्यंत ही रेल्वे सुरू ठेवली असती तर लोकांना होणारा त्रास वाचला असता. माथेरानच्या ‘टॉय ट्रेन’सारखे या रेल्वेला पण एक ‘हेरिटेज’ म्हणून पर्यटकांसाठी सुरू करता येऊ शकते. रेल्वेचे रूळ तयारच आहेत, त्याच्या देखभालीची तेवढी गरज आहे. सौर ऊर्जेवर किंवा विजेवर ती चालवली तर आवाज आणि प्रदूषण या दोन्हीपासून जंगल सुरक्षित राखता येईल. या रेल्वेतून मेळघाटचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना बघता येईल.

– अमोल सावंत, निसर्ग अभ्यासक, निसर्गकट्टा, अकोला.