रागाच्या भरात घरातून पळून आलेल्या एका मुलाचा नागपूर रेल्वे स्थानकावर अपहरणाचा प्रयत्न दक्ष हमालांनी हाणून पाडला. कुलींचा रोद्ररूप पाहून अपहरणाच्या बेतात असलेला इसमाने तेथून पळ काढला आणि रेल्वे स्थानकावर भटकत असलेल्या या मुलाला चाईल्ड लाईफच्या सुपूर्द करण्यात आले. ही घटना सोमवारी दुपारी नागपूर रेल्वे स्थानकावर घडली.

नेहमीप्रमाणे सामानासाठी प्रवाशांची वाट बघत असताना काही कुली बांधवांना ८ ते १० वर्षांचा एक मुलगा आढळला. कुली माजीद यांनी मुलाची आस्थेने विचारपूस केली. मुलाकडून आता घरी जायचे नाही. मन मानेल तिथे निघून जाईल, असे अपेक्षित उत्तर मिळाले. माजीदने त्याला जवळ बसवून घेतले. पण, तो पळून जाऊ लागला. राजकुमार शहारणे यांनी पाठलाग करून त्याला परत आणले. त्यानंतर कुलीबांधव त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. काही वेळाने एक दुचाकीस्वार तिथे आला. मुलाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला. शंका आल्याने कुली बांधव तिथे पोहचले. हा दुचाकीस्वार स्वतला शासकीय कर्मचारी सांगत होता. त्याला घर सोडून देण्याचा आग्रह करीत होता. पुण कुली बांधवांनी त्याच्या मनातील काळेबेरे ओळखून त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. शाब्दिक चकमकीनंतर त्याला परतवून लावले.

माजीद यांनी असमाजिक तत्त्वांचा धोका ओळखून मुलाला चाईल्ड लाईफच्या स्वाधीन केले. मुलाने रागाच्या भरात घर सोडले असावे आणि तो सांगत असलेले नाव आणि पत्ता चुकीचा असल्याची शक्यता आहे. यामुळे घरच्यांचा शोध घेऊन मुलाला त्यांच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.