नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर आज शनिवारी सकाळी त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा टाकून  झडती घेण्यात आली. या कारवाईत अनेक दस्तऐवज जप्त केल्याचा दावा सीबीआयकडून केला जात आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडून देशमुखांची प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे.

शुक्रवारी सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि १२ कलमान्वये गुन्हा दाखल केला व शनिवारी सकाळी ७ वाजता सीबीआयचे दहा अधिकारी डीएल-२, एव्ही-८८९८ आणि एमएच-३१, डीझेड-९९९९ क्रमांकाच्या दोन कारने नागपुरातील जीपीओ चौकातील त्यांच्या निवासस्थानी धडकले. यात दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता व पोलीस महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी पथकाचे नेतृत्व करीत होता. त्यावेळी अनिल देशमुख घरी उपस्थित होते.

‘सीबीआयला सर्व प्रकारचे सहकार्य’

सीबीआयचे पथक आज सकाळी  घरी दाखल झाले. त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात आले असे अनिल देशमुख यांनी सांगितले.