राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी. ए.च्या चौथ्या सत्रातील इतिहासाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास समाविष्ट करण्यात आला आहे. या विषयावरून सध्या जोरदार मतमतांतरे व्यक्त होत असून अनेकांनी या प्रकाराला तीव्र विरोध केला आहे. आता तर हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले आहे. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास समाविष्ट करण्याला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.

विद्यापीठाने बी. ए. पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केला असून चौथ्या सत्रामध्ये राष्ट्र निर्मितीमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका हे प्रकरण समाविष्ट केले आहे. या निर्णयाविरुद्ध समाजात वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. शिवाय संघ ही नोंदणीकृत संघटना नाही. त्यामुळे हे प्रकरण वगळण्यात यावे, अशी विनंती करणारे निवेदन विद्यापीठाच्या कुलगुरूंना सादर करण्यात आले. पण, त्या निवेदनावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या प्रकरणाचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने याचा कडाडून विरोध केला आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नुकतीच विद्यापीठाच्या या निर्णयावर टीका केली. या निर्णयाविरोधात मंगळवारी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतर्फे विद्यपीठापुढे निदर्शने करण्यात आली. यावेळी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणीही केली. आता नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष मून यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत राज्य सरकार, कुलगुरू आणि अभ्यास मंडळाला प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.