उपलब्ध नसलेल्या केंद्राचाही समावेश; शहर व ग्रामीण भागासाठी वेगवेगळे निकष

महेश बोकडे

नागपूर : शहरात ३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण सोमवारी सुरू झाले. परंतु वयाची तिशी गाठलेल्यांसाठी जे केंद्रच उपलब्ध नाही त्याचाही समावेश आरोग्य सेतू अ‍ॅपवर दिसत असल्याने नागरिकांत गोंधळाचे वातावरण होते. याशिवाय  शहर  व ग्रामीण भागासाठी निकषही वेगवेगळे होते.  ग्रामीण भागात कुणालाही केंद्रावर नोंदणी करून लस दिली जात होती तर शहरात बऱ्याच केंद्रावर ऑनलाईन वेळ घेतलेल्यांनाच लस मिळाली.  नवीन वयोगटातील व्यक्तींमध्ये लसीकरणाबाबत उत्साह असल्याने पहिल्याच दिवशी लसीकरणाचा टक्का वाढला.

केंद्र सरकारकडून लसीकरणासाठी कोविन अ‍ॅप व आरोग्य सेतूवर लसीकरणासाठी वेळ व ती किती लोकांना दिली जाईल याची संख्या दाखवली जाते. ग्रामीण भागातील केंद्रावर गेल्यावर नोंदणीनंतर लगेच लस मिळते. परंतु, शहरातील बऱ्याच केंद्रावर ऑनलाईन वेळ घेतल्याशिवाय  लस मिळत नाही. त्यामुळे शहरात ३० ते ४४ वयोगटातील व्यक्ती आरोग्य सेतूवर कोणत्या केंद्रात लसीकरणाची वेळ मिळेल, याची दिवसभर चाचपणी करताना दिसले. परंतु सकाळी काही तासांतच लसीची मर्यादा संपली. त्यामुळे अनेकांना वेळच मिळाली नाही. काहींना तर अ‍ॅपवर कुठलीच वेळ उपलब्ध नसल्याचे दाखवण्यात आले.  मेडिकलला ३० ते ४४ वयोगटासाठी लसीकरण केंद्र नाही. तरीही  तेथे केंद्र असल्याचे अ‍ॅपवर दिसत होते. त्यामुळे तरुणांत गोंधळाची स्थितीत होती.

सोमवारी काहींना आरोग्य सेतूवर मेडिकलला अठराहून अधिक वयोगटातील  ७७ व्यक्तींसाठी २१ जूनला पहिल्या मात्रेसाठी तर २२ जूनला ९८ जणांसाठी लसीकरणाचे वेळ राखीव असल्याचे दाखवले गेले. परंतु वेळ मिळवण्याची प्रक्रिया सुरू केल्यास ती पूर्ण होत नव्हती. शहरात सध्या १०५ लसीकरण केंद्र असून त्यातील ४५ कोव्हॅक्सिनचे आहेत. या केंद्रावर सध्या तीसहून अधिक वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू नाही.

इतर कोविशिल्डच्या केंद्रापैकी सुमारे ८५ केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठीही लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे नागपुरात लसीकरण वाढले आहे  तर ग्रामीणलाही सोमवारी तब्बल ९ हजाराहून अधिक व्यक्तींचे लसीकरण झाले. त्यात ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींचीच संख्या निम्म्याहून अधिक होती. बऱ्याच केंद्रांवर तरुणांची गर्दी दिसत होती.

पूर्व नोंदणी केलेल्यांनाच प्राथमिकता

रविवापर्यंत शहरात ऑनलाईन वेळ घेतल्याशिवाय कुणालाही लस दिली जात नव्हती. सोमवारी मात्र केंद्रावरही लसीकरणासाठी आलेल्यांची ४५ हून अधिक वयोगटातील व्यक्तींप्रमाणे नोंद घेणे सुरू झाले आहे. परंतु लसीकरण केंद्रांवर अचानक गर्दी वाढू नये म्हणून तूर्तास शहरातील बऱ्याच केंद्रांवर ऑनलाईन वेळ घेतलेल्यांनाच प्राथमिकता दिली जात आहे.

– डॉ. संजय चिलकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

७५ टक्के लसीकरण ३० ते ४४ वयोगटातील

शहर  व ग्रामीण भागात सोमवारी २४ तासांत २० हजार १३० व्यक्तींचे लसीकरण झाले. त्यात १७ हजार ९७७ व्यक्तींना लसीची पहिली तर २ हजार १५३ व्यक्तींना दुसरी मात्रा दिली गेली. पहिली मात्रा दिलेल्यांमध्ये तब्बल १५ हजार १७९ व्यक्ती हे १८ ते ४४ वयोगटातील होते. या वयोगटात खासगीतील निवडक १८ ते ३० वयोगटातील लाभार्थी सोडले तर ७५ टक्के लसी या  ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींनी घेतल्या.