मोक्का कारवाईमुळे गुन्हेगारांवर अंकुश

मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असलेल्या नागपुरातील पोलिसांना गुन्हेगारांवर अंकुश मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरातील गुन्हेगारीमध्ये घट झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपूरकडे सर्वाचे लक्ष लागले असते. मग येथील विकास, कायदा व सुव्यवस्था आदी बाबी प्रामुख्याने बघण्यात येतात. शहरात एखादी मोठी घटना घडल्यानंतर ती राष्ट्रीय बातमी ठरते. त्यामुळे गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यात येतो. त्यामुळे गुन्हेगारीवर अंकुश निर्माण करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्या अंतर्गत पोलिसांनी कार्य केले असून गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ऑक्टोबर-२०१७ पर्यंत यंदा ७१ खुनाच्या घटना घडल्या.

गेल्या वर्षी त्या ७७ होत्या. खुनाच्या प्रयत्नाची ६८ प्रकरणे उघडकीस आली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्या ७ ने कमी आहेत. २०१६ मध्ये खुनाच्या प्रयत्नाच्या घटना ७५ होत्या. दरोडय़ाच्या ९ घटना असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्या १२ने कमी आहेत. इतर गन्ह्य़ांमध्येही ही घट नोंदविण्यात आली आहे.

मोक्का मोहिमेमुळे परिणाम

२०१६ मध्ये नागपूर पोलिसांनी शहरातील २३ वर टोळ्यांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करून त्यांना तुरुंगात डांबले. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये खाकीची दशहत पसरली. अनेक टोळ्या व त्यांचे प्रमुख कारागृहात डांबले गेल्याने संघटित गुन्हेगारीवर अंकुश निर्माण झाला. यंदाही मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे प्रमाण सुरूच आहे. त्यामुळे अवैध धंदे किंवा तत्सम उद्योग करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवता आले आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याचे सांगण्यात येते.

भूमाफियांविरुद्धच्या कारवाईचा धसका

शहरातील भूमाफियांविरुद्धही पोलिसांनी विशेष कारवाई केली. त्याकरिता विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. एसआयटीकडे एकूण १ हजार ६७० पैकी ७०० चा तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून विविध भूमाफियांवर एकूण ३५ गुन्हे दाखल करण्यात आले. ४५ जणांना अटक करण्यात आली. त्यातील दिलीप ग्वालवंशी आणि जर्मन जपान टोळीवर मोक्काची कारवाई झाली. भूमाफियांनी बळकावलेले एकूण २०० एकर जागेवरील भूखंड मूळ मालकांना परत करण्यात आले. पीडितांना १ कोटी ९२ लाख ७९ हजार ७५० रुपये या कालावधीत परत मिळाले. पथकाचा उद्देश पूर्ण झाल्यानंतर आता ते बंद करण्यात आले. या कारवाईचाही धसका गुंड व भूमाफियांनी घेतला.