गटबाजीमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रचारसभा त्यांच्या अंगावर शाईफेक केल्याने काँग्रेसच्या इतर प्रमुख प्रचारकांनी स्वत:ला नागपूरपासून दूर राहण्यावरच भर दिला आहे. त्यामुळेच चव्हाण यांच्यानंतर आतापर्यंत एकाही मोठय़ा नेत्यांची अद्याप नागपुरात सभा झाली नाही.

नागपुरातील हसनबाग परिसरात प्रचारसभेत अशोक चव्हाण, काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांने शाई फेकून गोंधळ केला होता. शाई फेकणारा माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा कार्यकर्ता असल्याचे पुढे येत आहे. नारायण राणे यांचे पुत्र व आमदार नितेश राणे यांनी एक सभा घेतली. मात्र ही सभा पक्षाकडून नव्हे तर नितेश यांच्या समर्थकाने ती आयोजित केली होती. नागपूर महापालिकेवर दहा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे, काँग्रेसने या वेळी ही महापालिका जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. नागपूर हे मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने तेथील निवडणूक पक्षासाठीही प्रतिष्ठेचा विषय आहे. या पाश्र्वभूमीवर येथे काँग्रेसकडून प्रचारासाठी नेत्यांची फौज उभी करणे अपेक्षित होते. मात्र चव्हाणांच्या सभेनंतर स्थानिक नेतेच प्रचार यंत्रणा सांभाळीत आहेत. शहर काँग्रेसने  प्रदेश शाखेकडे पाठविलेल्या यादीत उल्हास पवार यांचा अपवाद सोडला तर एकाही मोठय़ा नेत्यांचा समावेश नाही याउलट सिनेअभिनेत्री नगमा, रजा मुराद यांच्या सभा आयोजित कराव्या अशी विनंती केली आहे.