आजपासून पुन्हा सेवेत रुजू होणार

नागपूर : राज्यभरातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत कार्यरत अस्थायी वैद्यकीय शिक्षकांचे समायोजन केले जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र मेडिकल टिचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाला मुंबईत गुरुवारी झालेल्या बैठकीत दिले. त्यामुळे सामूहिक रजेवर असलेले मेडिकल, मेयोसह राज्यभरातील साडेचारशेवर अस्थायी शिक्षक शुक्रवारपासून पुन्हा सेवेत रुजू होणार आहे.

अमित देशमुख यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रथम अस्थायी शिक्षकांना कायम करण्यासह इतर सर्व प्रश्न ऐकून घेतले. त्यानंतर दोन वर्षांहून अधिक काळापासून सेवेत असलेल्या शिक्षकांना पहिल्या टप्यात समायोजित केले जाईल. तर इतरांना समायोजित करण्याबाबत कायद्यातील तरतुदी तपासून निर्णय घेतला जाणार असल्याचेही देशमुख यांनी आश्वासन दिले. दरम्यान सातव्या वेतन आयोगानुसार भत्ते व वेतनाबाबत ३ ऑक्टोबरला वित्त विभागाकडे फाईल गेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या करोना काळात सगळ्यांनी चांगली सेवा दिली असून अशा आंदोलनातून रुग्णांना त्रास होणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या विनंतीवरून आंदोलकांनी सामूहिक रजा आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून सर्व शिक्षक सेवेवर परतणार आहे. शिष्टमंडळात राज्यभरातील असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यात नागपूरहून डॉ. समिर गोलावर यांच्यासह मेयोचेही दोन प्रतिनिधी गेले होते. दरम्यान दोन नोव्हेंबरपासून अस्थायी वैद्यकीय शिक्षकांना सामूहिक रजा आंदोलनाच्या नावावर काम बंद केले. चौथ्या दिवशी मंत्र्यांनी आश्वासन दिल्यावर आंदोलनाला यश आले आहे. यावेळी बैठकीला राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.