हॉटेल नाकारून परिचितांकडे मुक्काम; भाषण ऐकायला विदर्भातून लोक यायचे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपुरात झाली आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्याची प्रेरणाच संघ होता. त्यामुळे नागपूर हे शहर त्यांच्या हृदयात वसायचे. विद्यार्थी दशेतील संघ शाखेच्या प्रथम प्रवेशापासून तर संघ प्रचारक, जनसंघ, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून ते अनेकदा नागपुरात आले. नागपूरच्या प्रत्येक भेटीत त्यांनी अनेक माणसे जोडली. हॉटेल नाकारून ते आवर्जून परिचितांकडे मुक्काम करायचे.  वाजपेयींच्या निधनाचे वृत्त कळताच नागपुरातील त्यांच्या परिचितांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

जनसंघ, भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बैठकी असो की निवडणुकीची प्रचार सभा असो, ज्या ज्या वेळी नागपुरात येत होते त्यावेळी कधीही गेस्ट हाऊस किंवा शहरातील कुठल्याही हॉटेलमध्ये थांबत नव्हते. पाँडेचरीच्या राज्यपाल डॉ. रजनी राय, महालातील पं. बच्छराज व्यास आणि सुमतीताई सुकळीकर यांच्या निवासस्थानी ते थांबत होते. त्यांच्या कुटुंबात अटलजी पारिवारिक सदस्य म्हणून वावरायचे. त्यावेळी गंगाधरराव फडणवीस, मनोहरराव शेंडे, बळवंतराव ढोबळे, एकनाथराव जोग, अर्जुनदास कुकरेजा, रामप्रकाश आहुजा, दिवाकर धाक्रस या स्थानिक नेत्यांसोबत त्यांच्या बैठकी होत.

२००० मध्ये नागपुरात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती. या बैठकीवेळी अटलबिहारी वाजपेयी यांचा तीन दिवस नागपुरात मुक्काम होता. त्यावेळी सामान्य कार्यकर्त्यांपासून ते सगळ्यांची विचारपूस करीत होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते. नागपूरला असताना रिखबचंद शर्मा, रा.सू. गवई, मदनगोपाल अग्रवाल यांची ते भेट घ्यायचे. मदनगोपाल अग्रवाल यांना तर अटलजींनी खास जेवायला बोलावले होते.

अन् अटलजी कविता म्हणायला लागले

डॉ. रजनी राय यांच्या निवासस्थानी त्यांचा मुक्काम असायचा आणि अनेकदा तिथे कार्यकर्त्यांशी संवाद व्हायचा. २१ जुलै १९६८ मध्ये जनसंघाचे नेते सुंदरलाल राय यांचे निधन झाले. त्यावेळी अटलजी नागपुरात आले होते. दोन दिवस राय यांच्या निवासस्थानी राहिले होते. एकदा हिंदी मोरभवनमध्ये कवी संमेलन होते. अटलजींचा राय यांच्या निवासस्थानी मुक्काम होता. ते रात्री कवी संमेलनात पोहाचले आणि कोणालाही न सांगता प्रेक्षकांमध्ये बसले. मात्र, आयोजकांपैकी एकाने त्यांना बघितले आणि मग व्यासपीठावर घेऊन गेले. त्यावेळी अटलजींनी तीन कविता सादर केल्या होत्या.

बडकस चौकात घेतला पाटोडीचा आस्वाद

जनसंघाच्या काळात बैठकीसाठी नागपुरात आले असताना पं. बच्छराज व्यास यांच्याशी त्यांची भेट झाली होती. त्यानंतर ते नागपुरात आल्यावर त्यांच्या बडकस चौकातील निवासस्थानी राहत होते. व्यास यांच्या निवासस्थानापासून संघ कार्यालय जवळ असल्यामुळे ते सकाळी उठून संघात जात होते. पं. बच्छराज व्यास यांचे निधन झाल्यावर बडकस चौकात महापालिकेच्यावतीने त्यांचा पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. त्याचे उद्घाटन अटलजींच्या हस्ते झाले होते. त्यावेळी बडकस चौकात रामभाऊ पाटोडी म्हणून प्रसिद्ध होती. अटलीजींनी या पाटोडीचा आस्वाद घेतला होता. अटलजींच्या एकसष्टीनिमित्त नागपुरात धनवटे रंग मंदिरात सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना २१ हजारांची थैली देण्यात आली होती. नागपुरात त्यांच्या सभांना ऐकण्यासाठी केवळ नागपूर नव्हे तर विदर्भातून लोक येत होते.

झाशी राणी ते रिझव्‍‌र्ह बँक चौक पायी वारी

गोवारी समाजाचा १९९४ मध्ये विधानभवनावर मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चात झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ बळी गेले होते.  देशभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्या घटनेच्या दोन दिवसानंतर अटलबिहारी वाजपेयी नागपुरात आले आणि झाशी राणी चौक ते रिझव्‍‌र्ह बँक चौकापर्यंत पायी जात त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली होती. गोवारी समाजाचे नेते दिवं. सुधाकर गजबे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून माहितीही घेतली होती.

सुमतीताईंशी होते भावाचे नाते

जनसंघाच्या काळापासून सुमतीताई सुकळीकर या अटलजींसोबत सातत्याने प्रचारासाठी जायच्या. सुरुवातीला सुमतीताईंचे भाषण आणि त्यानंतर अटलजी बोलत होते. मध्यप्रदेश उत्तरप्रदेश, बिहार या राज्यात त्यांच्या सभा गाजायच्या. नागपूरला आल्यावर सुमतीताईंच्या घरी जाऊन ते चर्चा करीत होते. एक दिवस सुमतीताईची प्रकृती बरी नव्हती आणि अटलजींना त्यावेळी एका सभेसाठी त्यांना घेऊन जायचे होते. ताप असल्याचे लक्षात येताच अटलजी म्हणाले, ताई आप आराम करो, मै जाता हूं म्हणून अटलजी निघून गेले. मात्र, सुमतीताईंना राहावले नाही. त्याही स्थितीत त्यांनी अटलजींनी थांबवले आणि प्रकृती ठीक नसताना त्या अटलजीसोबत गेल्या. आणीबाणीच्या काळात ताई कारागृहात होत्या, त्यावेळी ताईंची भेट घेण्यासाठी अटलजी गेले होते. सुमतीताई आणि अटलबिहारी यांचे बहीण-भावाचे नाते होते. त्यामुळे जेव्हा केव्हा ते नागपूरला येत सुमतीताईंची भेट घेतल्याशिवाय जात नव्हते. नानाजी  देशमुख यांनी उभारलेल्या बालजगतलाही त्यांनी भेट दिली होती.