शासकीय रुग्णालयांतही उपचारासाठी प्रतीक्षा

नागपूर : जिल्ह्य़ात करोनाचा उद्रेक सुरू असून गंभीर रुग्णसंख्या वाढली आहे. येथील अनेक नावाजलेल्या खासगी रुग्णालयांतील खाटा  भरल्याने रुग्णांची फरफट होत आहे. मेडिकल, मेयोसह इतरही शासकीय रुग्णालयांतही  दाखल होण्यासाठी रुग्णवाहिकेतच काही तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

मेडिकलच्या कोविड रुग्णालयात दुपारी दोनच्या सुमारास नंदनवन येथील  एक वृद्ध करोनाग्रस्त रुग्णवाहिकेतून पोहचले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णवाहिकेत ऑक्सिजन लावण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा व पत्नीही होती. येथे येण्यापूर्वी रुग्णाने प्रथम वोक्हार्ट रुग्णालय, क्रिसेन्ट रुग्णालयासह आणखी एका रुग्णालयात दाखल्यासाठी प्रयत्न केले. ते निवृत्तीपूर्वी केंद्र सरकारच्या सेवेत होते. त्यामुळे त्यांच्याकडे वैद्यकीय विमा आहे. खासगी रुग्णालयात प्रवेश मिळत नसल्याने शेवटी ते मेडिकलमध्ये आले. रुग्णाच्या मुलाने डॉक्टरांशी संपर्क साधत तातडीने त्यांना दाखल करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी  खाटा पूर्ण भरल्याचे सांगत प्रतीक्षा करायला लावले.

त्रास वाढल्याने त्याने पुन्हा डॉक्टरांना किमान माझ्या वडिलांना एकदा तपासून घ्या, अशी विनंती केली. दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे त्याकडे लक्ष गेल्यावर  रुग्णावर उपचार सुरू झाले.  अमरावतीहूनही येथे एक गंभी रुग्ण  पोहचला. त्याच्या नातेवाईकांनीही  धंतोली परिसरातील तीन रुग्णालयांत दाखल्याचे प्रयत्न केले. शेवटी  मेडिकल  येथे आले. येथेही सुमारे दीड तास त्यांना प्रतीक्षा करावी लागली. मेयो रुग्णालयातही सध्या अशीच स्थिती आहे. मेडिकल, मेयोत  गंभीर  करोनाग्रस्त वाढत असल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. बुधवारीही येथे  ऑक्सिजनचे प्रमाण ७० हून खाली असलेले बरेच रुग्ण आले.

वेळीच उपचाराने रुग्ण बरा होतो

करोनाचे एकही लक्षण दिसताच तातडीने चाचणी व उपचार घेतल्यास रुग्ण घरातच बरा होऊ शकतो. हल्ली मेडिकलमध्ये जास्तच गंभीर झाल्यावर रुग्ण उपचाराला येत आहेत. त्यामुळे डॉक्टरांसह प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढतच चालला आहे. नागरिकांनी वेळीच चाचणी व उपचार करून ही स्थिती टाळायला हवी.

– डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल.