भाजपचे दरेकर यांचा काँग्रेसचे भाई जगताप यांना सवाल

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आज चांगलीच जुंपली. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला तेवढय़ाच आक्रमकपणे प्रतिउत्तर देण्याचे प्रयत्न सत्ताधारी बाकावरून झाले. भाजपचे प्रवीण दरेकर यांनी  ‘मराठा समाजाचा ठेका फक्त तुम्हीच घेतला का’ असा सवाल काँग्रेसचे भाई जगताप यांना करून आरक्षणाचा डाव विरोधकांवरच उलटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात गदारोळ होऊन कामकाज तहकूब करण्यात आले.

प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप करीत सरकारने आरक्षण केव्हा देणार, याबाबत कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी केली. भाई जगताप यांनी सरकारने केलेल्या घोषणांची आठवण करून दिली. सतीश चव्हाण यांनी जी.आर.मधील जाचक अटींकडे लक्ष वेधले तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या प्रतिज्ञापत्रात तावडे समितीचा उल्लेखच नसल्याचा दावा केला.

सभागृहात सामाजिक न्याय खात्याचे मंत्री उपस्थित असतानाही सभागृह नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाजू मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार गंभीर असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे तेथे भक्कम पुरावे सादर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्य़ात वसतिगृहांसाठी मराठा समाजाच्या संस्थांनी पुढाकार घ्यावा, सरकार त्यातील अडचणी दूर करेल, असे आश्वासन दिले.  भाजपचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी सरकारच्या उपाययोजनांवर समाधान व्यक्त करीत यापूर्वीच्या सरकारने असे काहीच केले नव्हते, असे सांगून विरोधकांना डिचवले. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी दरेकर यांना लक्ष्य केले असता संतापून दरेकर यांनी काँग्रेसचे भाई जगताप यांच्याकडे पाहात ‘भाई मराठा समाजाचा ठेका का फक्त तुम्हीच घेतला का’ असा सवाल केला.

सभापतींच्या अध्यक्षतेखाली बैठक

मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवडय़ात सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेण्याची घोषणा, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. तसेच यासंदर्भात नियुक्त उपसमितीच्या बैठकांमध्येही विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही सहभागी व्हावे, असे त्यांनी केले.