भीमा-कोरेगावची घटना

भीमा कोरेगाव येथील दंगलीचे पडसाद नागपुरात उमटले. संविधान चौकात संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. शहरात काही ठिकाणी बसवर दगडफेकही करण्यात आली. दरम्यान शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)तुकडय़ा मागवण्यात आल्या असून स्थानिक पोलिसांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.

आंदोलकांनी इंदोऱ्यातील भीम चौकात दुपारच्या सुमारास टायरची जाळपोळ केली. तर संध्याकाळी इंदोरा मैदानावर मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला. त्यानंतर इंदोरा चौक परिसरात एक कार फोडण्यात आली. तर कमाल चौक परिसरात एका स्टारबसवर दगड मारून काच फोडण्यात आली. वेगवेगळया ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. संविधान चौकातील आंदोलनाच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यावेळी पोलीस उपायुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वात अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तात होते. तर दंगल उदभवू नये म्हणून पोलिसांनी अतिशीघ्र कृती दल व दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले होते.

दरम्यान, दुपारी संविधान चौकात संतप्त नागरिकांनी धरणे दिली व रास्ता रोको आंदोलन केले. भीमा कोरेगाव घटनेतील दोषींवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन  जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी त्रिलोक हजारे, प्रदीप आगलावे, कृष्णा कांबळे, बालचंद्र खांडेकर, विजय मेश्राम, अमन कांबळे, रमेश शंभरकर, शैलेश धोंगडे, मंगेश जुनघरे, कुलदीप रामटेके, उत्तम शेवडे, गौतम कांबळे, जैमिनी कडू यांनी केली.

घटनेचा निषेध करण्यासाठी संविधान चौकात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांचा तेथील तरुणांशी वाद झाला. त्यामुळे त्यांना तेथून परत जावे लागले. त्यांनी तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांचे काहीही न ऐकता तरुणांनी त्यांच्या विरुद्ध घोषणा दिल्या.

‘‘भीमा कोरेगावमधील घटना बरेच काही सांगून जातो. आंबेडकरी समाजाने आता तरी एका छताखाली यायला हवे. बहुजन समाज पार्टी, बामसेफ, बीआरएसपी आणि रिपब्लिकन्सने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता सैनिक दल, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंघटना बळकट करण्याची गरज आहे. जेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपल्यावर हल्ले करायची कुणाची हिंमत होणार नाही.’’  – डॉ. भाऊ लोखंडे, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत