यापूर्वीच्या भाजपप्रणीत देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटले आहे. राज्यावर तब्बल ६ लाख ७१ हजार कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे, अशी टीका राज्याचे मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.

महाविकास आघाडीचे सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते सोमवारी नागपुरात पहिल्यांदाच आले. त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नव्या महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला आहे. राज्यावर ४ लाख ७१ हजार कोटी कर्जाचा (महसूल आणि भांडवली) बोझा आहे. याव्यतिरिक्त २ लाख कोटींचे अतिरिक्त कर्ज आहे. राज्यावर असा एकूण ६ लाख ७१ हजार कोटींचा कर्जडोंगर आहे. अशाप्रकारे फडणवीस यांनी राज्याला कर्जाच्या खाईत लोटले आहे. आता हेच सांगतात शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत दिली पाहिजे. आमचा तिला नकार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत. तत्पूर्वी आम्ही राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करणार आहोत, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

महाविकास आघाडीबाबत ते म्हणाले, काँग्रेसने या निमित्ताने देशभरात संदेश दिला आहे. काँग्रेस जाती-धर्माचे राजकारण करीत नाही, तर राज्यघटनेनुसार धर्मनिरपेक्ष तत्त्वावर राज्यकारभार करते. काँग्रेसने पहिल्या टप्प्यात एक मंत्रीपद आणि विधानसभा अध्यक्षपद देऊन आंबडेकरी आणि ओबीसी, शेतकरी वर्गाना प्रतिनिधित्व दिले आहे. आता विदर्भात काँग्रेसची आगेकूच होत असून भाजपची पिछेहाट होऊ लागली आहे. कारण, गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांनी केवळ थापा मारण्याचे काम केले. आता विदर्भाच्या प्रगती, विकास करण्याची आणि युवकांना रोजगार देण्याची जबाबदारी आमची आहे.

मंत्री नितीन राऊत यांची टीका  समंदरही बतायेगा कौन लौटकर आयेगा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ असे सांगताना स्वत:ला समुद्राची उपमा दिली होती. त्यावर राऊत म्हणाले, आम्ही विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले आहे. तेव्हा आता समंदर ही बतायेगा कौन लौटकर आयेगा, असा टोला फडणवीस यांना हाणला.

विदर्भाला भरभरून मदत

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वेगळ्या विदर्भाला विरोध करताना या भागाच्या विकासासाठी भरभरून मदत करण्याचे वचन दिले होते. राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदर्भाच्या विकासात कुठलाही अडथळा निर्माण करणार नाहीत. याचा मला पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले.

४० हजार कोटींचा जाब जनता विचारेल

कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांत केंद्राला ४० हजार कोटी रुपये परत केल्याचे विधान केले. त्यावर फडणवीस भलेही स्पष्टीकरण देत असतील, परंतु एका जबाबदार भाजप नेत्याने केलेला गौप्यस्फोट असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. फडणवीस यांनी ८० तासांत हे काम केले, त्याचा जाब येथील जनता नक्कीच विचारेल, असेही डॉ. नितीन राऊत म्हणाले.