काँग्रेसच्या नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे प्रतिपादन

नागपूर : काँग्रेसने सद्भावनेने देश पुढे घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतला. परंतु अलीकडे सुडाचे, द्वेषाचे राजकारण सुरू आहे. इंग्रजांनी जे फोडा आणि राज्य करा धोरण स्वीकारले.त्याच वळणावर आज भारत उभा आहे. आपल्याला कुठल्या प्रकारचा भारत हवा आहे, याचा विचार आता करावा लागणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त बहुजन विचारमंचच्या वतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आज गरुवारी आजादी से..आजादी की ओर हा नाटय़ अविष्कार प्रस्तुत करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर बहुजन विचारमंचचे संयोजक नरेंद्र जिचकार, महिला काँग्रेस शहराध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, नाटकाचे लेखक व दिग्दर्शक सलीम शेख, संगीतकार चारुदत्त जिचकार तर श्रोत्यांमध्ये आमदार सुनील केदार, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन,माजी मंत्री रणजीत देशमुख, माजी महापौर कुंदा विजयकर उपस्थित होते.

गेल्या ७० वर्षांत काय केले, असे विचारणे म्हणजे एखाद्याला तुझ्या धमण्यातून कोणते रक्त वाहते, असे विचारण्या सारखे आहे. ज्या व्यक्तीने देशासाठी ११ वर्षांचा कारावास भोगला. त्यांच्याबद्दल चुकीचे बोलणे, व्हॉट्सअ‍ॅपवरून त्यांच्याविषयी द्वेष निर्माण करणे दुखदायक आहे. मोठय़ा आवाजात सांगितली जाणारी प्रत्येक गोष्ट सत्य नसते, असा टोला त्यांनी हानला. कार्यक्रमाची रूपरेषा मांडताना नरेंद्र जिचकार यांनी आज उत्तर वैदिक काळात असल्यासारखे वाटते, असे सांगितले.

‘आजादी से.. आजादी की ओर’ने रिझवले

आजादी से.. आजादी की और या सुमारे ९० मिनिटांच्या नाटय़ प्रस्तुतीमधून काँग्रेसच्या स्थापनेपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळापर्यंतचा इतिहास प्रभावीपणे मांडण्यात आला. यात महात्मा गांधी, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातील मैत्रिपूर्ण संबंधावर प्रकाश टाकण्यात आला. या नाटय़ प्रस्तुतीमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप कसा काँग्रेस नेत्यांबद्दल गैरसमज निर्माण करीत आहे, हे दाखवण्यात आले.