News Flash

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात भाजपला संमिश्र यश!

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

रामटेक 

निर्विवाद यश नाहीच; पाच ठिकाणी विजय, चार ठिकाणी विरोधकांची बाजी

मराठा मोर्चे, नोटाबंदी या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पहिल्या तीन टप्प्यांतील नगरपालिका निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळविणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर जिल्ह्य़ात मात्र निर्विवाद यश मिळविता आले नाही. जिल्ह्य़ातील नऊपैकी पाच पालिकांचे नगराध्यक्षपद भाजपला मिळाले आहे. विदर्भात एकहाती यश मिळालेल्या भाजपला नागपूर या प्रभावक्षेत्रात फटका बसल्याने आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

केंद्र आणि राज्यातील सत्ता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नेतृत्व आणि त्यांनी प्रचारात प्रत्यक्ष घेतलेला सहभाग, ऊर्जामंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार महिन्यांपासून केलेली तयारी, कार्यकर्त्यांची फौज, प्रचार यंत्रणेची मुबलकता, सहापैकी पाच मतदारसंघांत पक्षाचे आमदार आणि प्रचंड आर्थिक पाठबळ या पाश्र्वभूमीवर भाजप सर्वच्या सर्व पालिका जिंकणार असेच चित्र निर्माण करण्यात आले होते. या उलट नेतृत्वाचा अभाव, कमालीची गटबाजी आणि निधीची चणचण असे विरोधक म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षांची होती. या परिस्थितीत भाजपला मिळालेले यश मर्यादित स्वरूपाचे ठरते. विपरीत परिस्थितीतही विरोधकांना बलाढय़ भाजपला चार प्रमुख ठिकाणी नमविण्यात आलेले यश वारे कोणत्या दिशेने वाहू लागले याचे संकेत देणारे ठरले आहे. विशेष म्हणजे नरखेड पालिकेत भाजपला १७ पैकी एकही जागा मिळवता आली नाही. भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी येथे शक्ती पणाला लावली होती. याहीपेक्षा धक्कादायक निकाल म्हणजे कामठी पालिकेचा ठरला. कामठी नगरपालिका ही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात आहे. सर्व प्रयत्न करूनही त्यांना ती राखता आली नाही. तेथे काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला. कळमेश्वरमध्ये मुख्यमंत्र्यांनी सभा घेऊनही तेथे काँग्रेस-राष्ट्रवादीला बहुमत मिळाले.

सर्वच्या सर्व पालिका जिंकण्याचा संकल्पच भाजपने केला होता. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने येथील विजय हा राज्यभरातील विजयावर शिक्कामोर्तब ठरणारा असल्याने जिंकण्याच्या तयारीत कोणतीही कसर बाकी ठेवण्यात आली नव्हती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका दिवसात सहा तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस जिल्हाभर फिरून ठिकठिकाणी सभा घेतल्या. जिल्ह्य़ातील सर्वच पालिका जिंकू असा विश्वास फडणवीस यांच्यासह सर्वच भाजपचे नेते व्यक्त करीत होते. त्या तुलनेत मिळालेले यश जेमतेम स्वरूपाचे आहे. नऊपैकी भाजपने उमरेड, कळमेश्वर, रामटेक, सावनेर आणि खापा पालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, मात्र कळमेश्वरमध्ये नगरसेवकांची सर्वाधिक संख्या ही राष्ट्रवादीकडे आहे. इतर चार ठिकाणी भाजप बहुमतात आहे. उमरेडचा विजय भाजपसाठी आनंद देणारा आहे, कारण तेथे दहा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता होती. तेथील आमदार सुधीर पारवे यांच्याकडे या यशाचे श्रेय जाते. काँग्रेस नेते व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासाठी हा धक्का आहे.

chart

काटोल, नरखेड हा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा मतदारसंघ. गत निवडणुकीत तेथे त्यांचा पराभव झाला. सध्या तेथे भाजपचे डॉ. आशीष देशमुख आमदार आहेत. या दोन्ही देशमुखांनी दोन्ही पालिकांसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र भाजपमधून बाहेर पडलेल्या चरणसिंह ठाकूर यांनी दोन्ही देशमुखांना चीत केले. येथे भाजपला फक्त एक तर राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही. नगराध्यक्ष आणि २३ पैकी १८ जागा जिंकून ठाकूर यांच्या ‘विदर्भ माझा’ने शहरावरील वर्चस्व कायम ठेवले. नरखेडमध्ये तर भाजपला एकही जागा मिळाली नाही. नगराध्यक्षपदी निवडून आलेले अभिजित गुप्ता मूळचे काँग्रेसचेच, पण तिकीट वाटपावरून बिनसल्याने त्यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले व नगराध्यक्षपदासह पाच नगरसेवकही निवडून आणले. येथे राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. यामुळे अनिल देशमुख यांची काही प्रमाणात प्रतिष्ठा कायम राहिली.

सावनेर तालुक्यातील खापा, मोहपा, कळमेश्वर आणि सावनेर चार पालिकांमध्ये काँग्रेस आमदार सुनील केदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. खापा आणि मोहप्यात काँग्रेसचीच सत्ता होती, खाप्यातील सत्ता भाजपकडे गेली. मोहप्यात काँग्रेसने वर्चस्व कायम राखले. खाप्याऐवजी काँग्रेसने कामठीत मिळविलेले यश अधिक महत्त्वपूर्ण ठरले. रामटेकमध्ये भाजपने सेनेकडून सत्ता काबीज केली. कळमेश्वरमध्ये सेना व भाजप स्वतंत्र लढले, त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला व येथे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बहुमत प्राप्त केले.

कामठीतील पराभवाने बावनकुळेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

कामठी, नरखेड आणि काटोल पालिकेचे निकाल भाजपसाठी सर्वाधिक जिव्हारी लागणारे आहेत. कामठी हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ आहे. चार महिन्यांपासून शासनाच्या विविध योजनांमधून निधी आणून कामठी कामांचा धडाका सुरू केला होता. माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्या बरिएमला सोबत घेऊन त्यांनी आपली ताकद आणखी भक्कम करून घेतली होती.एमआयएम रिंगणात असल्याने त्याचा फायदा भाजपलाच होणार असे चित्र होते. मात्र भाजपच्या पराभवाने सर्वानाच धक्का  बसला. बावनकुळे यांच्यासाठी ही आत्मचिंतनाची बाब आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 1:37 am

Web Title: bjp in nagpur 2
Next Stories
1 महापालिका निवडणूक फेब्रुवारीतच
2 यंदा सूर्य आणि पृथ्वीजवळून ५० धूमकेतू जाणार
3 अनाथालयातून १८ वर्षांनंतर बाहेर पडणाऱ्यांचे काय होते?
Just Now!
X