स्पष्ट बहुमतामुळे यश

नागपूर : विदर्भातील चारही महापालिकांमध्ये भाजपने महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे राखली. पक्षाकडे स्पष्ट बहुमत असल्याने राज्यातील नव्या सत्तासमीकरणाचा फटका या पक्षाला बसला नाही.

राज्यात सत्तास्थापनेसाठी सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येत आहेत. यासंदर्भातील घडामोडींना वेग आला असतानाच शुक्रवारी राज्यात महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुका झाल्या. विदर्भात नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला अशा एकूण चार महापालिका असून सर्वच ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात सत्ता भाजपकडेच होती. पुढील अडीच वर्षांसाठी महापौर व उपमहापौरांची शुक्रवारी निवड झाली. या सर्व ठिकाणी भाजपनेच विजय संपादन केला. नागपूरमध्ये संदीप जोशी (महापौर), मनीषा कोठे (उपमहापौर), चंद्रपूर- राखी कंचर्लावार (महापौर), राहुल पावडे (उपमहापौर), अमरावतीमध्ये चेतन गावंडे (महापौर), कुसुम साहू (उपमहापौर) आणि अकोला येथे अर्चना मसने (महापौर), राजेंद्र गिरी (उपमहापौर) यांची निवड झाली. पक्षाच्या उमेदवारांना विजयी घोषित करताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपूर महापालिकेत भाजपकडे १५१ पैकी १०७ सदस्य आहेत. त्यामुळे महापौर भाजपचाच होणार हे निश्चित होते. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्य़ात महापालिकेत भाजपकडे बहुमत असले, तरी एक गट नाराज असल्याची चर्चा होती. मात्र दोन्ही पदांवर भाजपचेच नगरसेवक विजयी झाले. अमरावती आणि अकोला महापालिकेतही भाजपने बहुमताच्या आधारावर महापालिकेत सत्ता कायम राखली.