नाना पटोले यांची टीका

नागपूर : झारखंड सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून झाल्याचे समोर आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर हल्लाबोल केला असून भाजप हा लोकशाही न मानणारा पक्ष असल्याचे म्हटले आहे. भाजपचे झारखंडमधील पाप उघडीस येण्यास सुरुवात झाली आहे, असेही ते म्हणाले. ते नागपूर विमानतळावर  माध्यमाशी मंगळवारी बोलत होते.

झारखंड सरकार पाडण्यासाठी तेथील दोन काँग्रेसचे आणि एक अपक्ष आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर दोघांनी केला, असे वृत्त आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळखळ उडाली आहे. त्यावर बोलताना पटोले म्हणाले, फोन टॅप करून लोकांवर पाळत ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे मध्यप्रदेश आणि कर्नाटक सरकार अशाच्या पद्धतीने पाडण्यात

आले. झारखंड सरकार पाडण्यासाठी अभिशेष दुबे याला भाजपने हाताशी धरले. दिल्लीत भाजपच्या लोकांनी दुबेची भेट घेतली. हे सर्व एफआयआरमध्ये आले आहे. भाजप लोकशाहीला न मानणारा पक्ष आहे, असे मत आता लोकांचे बनू लागले आहे.

लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांचा घोडा बाजार करणे आणि सरकार पाडून जनमताचा अपमान करणे भाजपची वृत्ती आहे. मोदी आणि भाजपने देशभरात लोकशाहीचा खून चालवला आहे. हे त्यांचे पाप आज ना उद्या उघडीस येणार आहे. किंबहुना त्याची सुरुवात झाली आहे. राज्यात अतिवृष्टी आणि दरड कोसळल्याने मोठे संकट होते. पण भारतीय जनता पक्ष या संकटातही करीत असलेले राजकारण दुर्दैवी आहे. मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार आहे, असे ते म्हणाले.