पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, आसामात प्रथमच भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले आहे. पक्षाच्या घवघवीत यशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्रातील प्रचारकांची भूमिका निर्णायक ठरली आहे. संघाची राज्यात अनेक वर्षांंपासून वेगवेगळ्या पातळीवर कामे सुरू असून, त्याची सुत्रे नागपुरातील प्रचारकांच्या हाती आहेत.
प्रथम केंद्रात आणि त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तापालटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर दिल्ली आणि बिहार विधानसभेच्या निवडणुकीतही संघ सक्रिय होता. तेथे भाजपच्या पदरी अपयश आल्याने त्यांच्या सक्रियतेची चर्चा झाली नाही. मात्र, आसाम निवडणुकीत भाजपला मिळालेले यश लक्ष वेधणारे ठरले. या भागात अनेक वर्षांपासून सुरू असलेली संघाची विविध कामे यामुळे ठळकपणे पुढे आली. या मोहिमेत नागपूरकर संघ प्रचारकांचे स्थान अग्रस्थानी आहे. संघाचे अखिल भारतीय शारीरिक प्रमुख सुनील देशपांडे यांचे या भागात काम आहे. सध्या तेथे भाजपचे काम सांभाळणारे रमेश शिलेदार पूर्वी प्रचारकच होते. नंदू जोशी, सुरेंद्र कालखेडकर, शशी चौथाईवाले, प्रसाद बर्वे, सुनील किटकरू, बबन बढीये, अशोक वर्णेकर, विनय तारे, विराग पाचपोर, राम सहस्त्रभोजनी, दिलीप अग्निहोत्री, श्रीपाद सहस्त्रभोजनी, राजाभाऊ कुकडे, विवेकानंद केंद्राचे काम पाहणारे विश्वास लपालीकर, पार्वतीपूर (अरुणाचल) मध्ये कार्यरत असणारे अशोक वर्णेकर आणि सध्या तेथे प्रचारक म्हणून काम करणारे राजेश देशकर अशी संघाची मोठी फळी त्या भागात कार्यरत होती. मुलींच्या शिक्षणक्षेत्रात राष्ट्रीय सेविका समितीचेही काम आहे. तेथील काही मुलींना समितीने नागपुरात शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. समितीच्या कार्यालयात त्यांचे निवासस्थान आहे, समितीच्या अखिल भारतीय पदाधिकारी सुनीता हळदेकर या अनेक वषार्ंपासून याच भागात काम करीत आहेत. गावोगावी फिरून प्रचारकांकडून मतपरिवर्तनाचे काम केले जाते. त्याचा फायदा भाजपला या निवडणुकीत झाल्याचे समजते.

आसामात बांगलादेशी घुसखोर यासह शिक्षण, आरोग्य, रोजगार या क्षेत्रात समस्या होत्या. संघाने सेवा कार्याची मोहीम राबविताना त्यावर लक्ष केंद्रित केले होते. संघ प्रचारक म्हणून काम करताना आम्ही राजकीय फायद्या-तोटय़ाचा विचार करीत नाही.
– प्रसाद बर्वे, सुनील किटकरू,
संघ प्रचारक, आसाम