भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी

भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहराच्या कार्यकारिणीत गंभीर गुन्हे असलेल्यांना वेगवेगळ्या पदावर स्थान देण्यात आले आहे. त्यातून सतीश कागदे आणि बंटी शर्मा या दोघांना वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. या दोघांचे शहरातील विविध भागात शुभेच्छाचे मोठे होर्डिग लागले होते, ते सुद्धा काढण्यात आले. कार्यकारिणीत असलेल्या आणि उजेडात आणलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांची नावे मात्र यादीत कायम आहेत.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या नागपूर महानगराची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्या कार्यकारिणीत असलेल्या काही पदाधिकाऱ्यांवर विविध गंभीर गुन्हे असल्याचे प्रकरण ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चामध्ये खळबळ उडाली. ज्या गुन्हेगार असलेल्या कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले ते कोणत्या नेत्यांच्या माध्यमातून, याची माहिती पक्षश्रेष्ठींकडून घेतली जात आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे नेतृत्व शिवाणी दाणी यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यांनी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कार्यकारिणी जाहीर करताना शक्तिप्रदर्शन केले होते. त्याचवेळी त्यांनी शहराची कार्यकारिणी जाहीर केली आणि त्यात सतीश कागदे आणि बंटी शर्मा यांची उपाध्यक्ष म्हणून नावे जाहीर केली होती. इमामवाडा पोलीस ठाण्यात कागदे याच्यावर गुन्हे असताना ठाण्यापासून काही अंतरावर मोक्षधाम घाट परिसरात शुभेच्छाचे त्याचे मोठे होर्डिग लावण्यात आले होते. शिवाय बंटी शर्माचे नंदनवन चौक, भांडे प्लॉट चौक आणि जगनाडे चौकात शुभेच्छाचे होर्डिग लावले होते. मात्र, ते सर्व खाली उतरविण्यात आले. या दोघांची नावे यादीतून वगळण्यात आली असली तरी पक्षाकडून मात्र अधिकृतपणे त्यांना काहीच सूचना देण्यात आल्या नसल्याची महिती समोर आली नसल्यामुळे ते उपाध्यक्ष असल्याचे कार्यकर्त्यांना सांगत आहेत. याशिवाय बाळा वानखेडे, हर्षल घाटे, रणजित सफलकरचा पुतण्या आकाश सफलकर, तपन जयस्वाल यांची नावे मात्र कार्यकारिणीत असून त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाते का? याकडे लक्ष लागले आहे.

सतीश कागदे आणि बंटी शर्मा यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आले की नाही याबाबत माहिती नाही. कार्यकारिणी जाहीर करताना त्यांची नावे सर्वात शेवटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे ती यादीत आहे. प्रसार माध्यमांकडे पाठवण्यात आलेली यादी कोणती आहे, याबाबत माहिती घ्यावी लागेल, मात्र तूर्तास ते दोघे कार्यकारिणीत आहे.

– शिवाणी दाणी, शहर अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा

भारतीय जनता युवा मोर्चाची यादी मागवून ज्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे आहे त्याची सत्यता पडताळून बघितली जाईल आणि चौकशीनंतर कार्यकारिणीत ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.

– आमदार सुधाकर कोहळे, शहर अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष