न्यू ईरा रुग्णालयातील एका मेंदूमृत रुग्णाच्या अवयवाचे पाच वेगवेगळ्या गरजू रुग्णात बुधवारी यशस्वी प्रत्यारोपण झाले. यकृत आणि मुत्रपिंडाचे न्यू ईरा रुग्णालयातील दोन वेगवेगळ्या रुग्णांत तर दुसऱ्या मूत्रपिंडाचे सुपरस्पेशालिटीतील एका रुग्णात प्रत्यारोपण करण्यात आले. अवयवदानासाठी रुग्णाच्या चार मुलींनी पुढाकार घेतला.

किसन पांडुरंग बनवडे (६२) रा. भंडारा असे दानदात्याचे नाव आहे. त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना प्रथम भंडारा व त्यानंतर नागपूरच्या न्यू ईरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती जास्तच खालावली. त्यांच्या मेंदूशी संबंधित विविध तपासणीत त्यांचा मेंदूमृत झाल्याचे पुढे आले. मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश अग्रवाल, हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती, डॉ. निधीश मिश्रा यांनी कुटुंबाला अवयवदानाबाबत माहिती दिली. तिघांना जीवदान व दोन रुग्णांना नवीन दृष्टी मिळणे शक्य असल्याचे बघत किसन यांच्या चार मुलींनी पुढाकार घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. ही माहिती विभागीय अवयव  प्रत्यारोपण समितीच्या डॉ. विभावरी दाणी आणि डॉ. रवि वानखेडे यांना देण्यात आली.

त्यानंतर हे यकृत न्यू ईरातील एका ४० वर्षीय रुग्णात तर मूत्रपिंड ५८ वर्षीय रुग्णात आणि दुसरे मूत्रपिंड सुपरस्पेशालिटीतील ३८ वर्षीय रुग्णात प्रत्यारोपीत करण्यातआले. दोन बुब्बुळ माधन नेत्रपेढीला देण्यात आले असून ते प्रत्यारोपित होऊन दोघांना नवीन दृष्टी मिळणार आहे.