नऊ दिवसांपासून शोध सुरू, शेवटी मृतदेहच सापडला

आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या वंश ओमप्रकाश यादव रा. खामला, जुनी वस्ती याचा नवव्या दिवशी सोनेगाव तलावात एका प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेह सापडला. शिवीगाळ केल्यामुळे त्याच्या अल्पवयीन मावस भावानेच त्याची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

वंश हा सिंधी हिंदी हायस्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिकत होता. वंश व कमलेश (आरोपीचे बदललेले नाव) यांच्या वडिलांचा दुधाचा व्यवसाय आहे. कमलेश हा दहावी अनुत्तीर्ण आहे. २७ मार्चला वंश हा बेपत्ता झाला. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. तो आढळला नाही. त्यानंतर त्याची आई गौरी यांनी प्रतापनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास सोनेगाव तलावात प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना ?मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. प्रतापनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप भोसले, भारत क्षीरसागर, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, प्रशांत चौगुले, प्रदीप अतुलकर, विक्रांत सगणे, नितीन पगार, किरण चौगले, प्रभाकर शिऊरकर यांनी चौकशी करून आरोपी कमलेशला ताब्यात घेतले. त्याने हत्या केल्याचे मान्य केले. त्यानंतर त्याला प्रतापनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.

असा केला खून

वृंदावन गार्डन अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत गोठा आहे. कुणालातरी गोवऱ्या द्यायच्या होत्या. त्यासाठी २७ मार्चला सकाळी ११ वाजता कमलेश हा वंशला घेऊन तेथे गेला. प्लास्टिकच्या पिशवीत गोवऱ्या भरताना कमलेश व वंश या दोघांमध्ये वाद झाला. वंश याने कमलेशला शिवीगाळ केली. त्यामुळे कमलेशने दोरीने वंश याचा गळा आवळला. वंश याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच पिशवीत वंशचा मृतदेह टाकून तो दोरीने बांधला. मोपेडने मृतदेह नेऊन सोनेगाव तलावात फेकला, असे कमलेशने पोलिसांना सांगितले.

असा लागला छडा

पोलिसांना घटनास्थळावर पोते व दोरी आढळली. पोते व दोरीचा वापर गोवऱ्या आणण्यासाठी करण्यात येत असल्याचे त्यावेळी वंशच्या नातेवाईकांनी सांगितले. शिवाय ते साहित्य त्यांच्याच घरची बाब निष्पन्न झाली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वंशच्या नातेवाईकाने खामला भागातील एका ऑटोचालकाला सोनेगाव तलावात किती पाणी आहे, याबाबत विचारणा केली होती. ही माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी वंश याच्या तीन संशयित नोतवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान कमलेशने वंश याची हत्या केल्याचे मान्य केले.