कंबर, पाठ, गुडघेदुखीचाही त्रास; अस्थिरोग तज्ज्ञांचे निरीक्षण

महेश बोकडे, नागपूर</strong>

वयाच्या साठीनंतर नागरिकांमध्ये  साधारणपणे कंबर, पाठ, गुडघेदुखीचा त्रास वाढतो. परंतु बालपणात कॅल्शियमची पुरेशी मात्रा शरीरात न गेल्यास चाळीशी, पन्नासीनंतरच्या साठीतील वरील दुखण्याचा त्रास सुरू होतो, असे  निरीक्षण शहरातील अस्थिरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

बैठी जीवनशैली, मैदानी खेळांचा अभाव, वाढते वजन यासह इतर कारणांमुळे हल्ली शहरी भागातील लहान मुलांमध्येही गुडघेदुखीसह हाडांशी संबंधित आजार वाढत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञानुसार प्रत्येक व्यक्तीत वयोमानानुसार हाडे ठिसूळ होण्याची प्रक्रियाही लवकर सुरू होते. साठीनंतर अस्थिरोगाचा आजार वाढतो. नागपूरच्या मेडिकलमध्ये वर्षांला हजारो रुग्ण उपचाराला येतात. त्यात साठीनंतर वृद्धांमध्ये स्नायूंच्या मांसपेशींची ताकद कमी होणे, उभे राहताना तोल जाणे, कंबर, पाठ, गुडघे, मणक्यासह शरीराच्या सांध्यात वेदना होणे आदी त्रास असलेल्यांचा समावेश असतो. मात्र, हल्ली या रुग्णालयांत ४० ते ५० वयोगटातील व्यक्तींनाही वरील दुखण्याचा त्रास जाणवू लागला आहे. यापैकी काही रुग्णांनी बालपणी कॅल्शियमयुक्त पदार्थाचे सेवन कमी केल्याचे मान्य केले. यामुळेच या रुग्णांना कमी वयात त्रास सुरू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला. अमेरिका, ब्रिटनसह दक्षिण अफ्रिकेतील काही वैद्यकीय संस्थांच्या संशोधनातही ही बाब नोंदवण्यात आली आहे.

स्काय ऑर्थोपेडिकचे निरीक्षण

स्काय ऑथरेपेडिक अॅण्ड स्पाईन क्लिनिकमध्ये वर्षांला सुमारे १० हजार रुग्ण कंबर, पाठ, गुडघेदुखीसह हाडांशी संबंधित त्रास असल्याने उपचाराला येतात. यात ४ हजारावर रुग्ण हे साठीनंतरचे होते. ४० ते ५० वयोगटातील रुग्ण  २५० होते.

युरोप, जर्मनी, पॅरिस, रशिया, ऑस्ट्रेलिया आदी देशात बालपणापासूनच मुलांच्या आहारावर लक्ष दिले जाते व त्यांना कॅल्शियमयुक्त अन्नपदार्थ आवश्यक मात्रेत दिले जाते. त्यामुळे तेथे प्रत्येक व्यक्तीचे आयुर्मान  ९० वर्षांहून अधिक आहे. त्यांना वयाच्या ६५ वर्षांनंतर हाडांसी संबंधित त्रास सुरू होतात. भारतातही वयोमान ८५ पर्यंत गेले असले तरी कमी वयात हाडांचे दुखणे सुरू होते ही चिंतेची बाब आहे.

– डॉ. आकाश सावजी, अस्थिरोग तज्ज्ञ, स्काय ऑथरेपेडिक अ‍ॅण्ड स्पाईन क्लिनिक, नागपूर.

 

मुलांना कॅल्शियमयुक्त आहार द्या

लहान मुलांपासून तरुणांमध्ये फास्ट फूड, जंक फूडचे  सेवन वाढत आहे. दुसरीकडे पारंपरिक कॅल्शियमयुक्त अन्नपदार्थाचे सेवन कमी होत चालले आहे. त्यामुळे कमी वयात तरुणांमध्ये हाडांची समस्या सुरू होते. खाण्यावर नियंत्रण नसेल तर ही समस्या पुढे आणखी गंभीर होऊ शकते.

– प्रा. डॉ. मोहम्मद फैजल, अस्थिरोग तज्ज्ञ व प्रमुख, ट्रामा केयर सेंटर, नागपूर.