हुडकेश्वर रस्त्याला तडे, खड्डे आणि गिट्टीही बाहेर

नागपूर ‘स्मार्ट सिटी’ होण्यापूर्वीच शहरातील जनता विकास कामांबाबत अधिकाधिक ‘स्मार्ट’ (दक्ष) होऊ लागली असून ते आपल्या भागातील सिमेंट रस्त्यांच्या कामातील गैरव्यवहार चव्हाटय़ावर आणत आहे.  हुडकेश्वर सिमेंट रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची बाब अशाच प्रकारने उघड झाली असून येथील रस्त्याला काही भागाला तडे गेले आहेत, काही ठिकाणी गिट्टी बाहेर डोकावत आहे तर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत.

हुडकेश्वर मार्गावरील सांस्कृतिक भवन ते नाल्यापर्यंत सिमेंट रस्ता, रस्ता दुभाजक, पदपथ आणि पावसाळी नालीचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट निघून गिट्टी बाहेर आली आहे. याच मार्गावर बँक ऑफ इंडियाच्या समोर रस्त्याला तडे गेले. निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरण्यात आले. तसेच सिमेंटचे प्रमाण सुद्धा कमी आहे. बांधकामाचे मानक पाळण्यात आलेले नाही. या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे, असे स्थानिक नागरिक गोविंद शिरपूरकर म्हणाले. उदयनगर चौक ते गजानन नगर शाळा या दरम्यान रस्त्याचे दीड महिन्यात सिमेंट निघाले. यासंदर्भातही स्थानिकांनी दूरध्वनीवर तक्रार केली आहे.

झाडांचा श्वास कोंडतोय

सिमेंट रस्ते तयार करताना बांधकामेच निकष पाळण्यात येत नाही, असे दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील प्रतापनगर ते कोतवालनगर परिसरातील झाडांची स्थिती पाहिल्यावर दिसून येते. तेथे उपनिबंधक कार्यालयाजवळ झाडांच्या सहभोवताल सिमेंट लावण्यात आले आहे, त्यामुळे मुळापर्यंत पाणी मुरण्यासाठी जागाच नाही, असे स्थानिक नागरिक आशुतोष दाभोळकर यांनी सांगितले.

नेत्याच्या भावालाच कंत्राट

हुडकेश्वर सिमेंट रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाचे कंत्राट सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याच्या भावाकडे आहे. त्यामुळे आता या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून नव्याने रस्ता बांधण्यात येणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

पाहणीनंतर डागडूजी

जनमंचने वेस्ट हायकोर्ट मार्गावरील लॉ कॉलेज चौक ते लेडिज क्लब चौक या दरम्यान सिमेंट रस्त्यांची पाहणी केली आणि कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यावर कंत्राटदाराने या रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक बदलण्यास सुरुवात केली. परंतु संपूर्ण रस्त्यांचे बांधकाम निकृष्ट असल्याने केवळ ब्लॉक बदलून काम भागणारे नाही. रस्त्यांमध्ये सिमेंटचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले होते.