देवेंद्र गावंडे –  devendra.gawande@expressindia.com

हे आत्मकथन नाही. फार फार तर आत्मनिवेदन म्हणा. तसेही लिहिताना मला कमालीचा त्रास होतो. हात थरथरतात. वय झाले ना! नव्वदीच्या घरात पोहचलो असलो तरी माझे मन मात्र तरुण आहे. काही लोक हे मानायलाच तयार नाहीत. ‘वय झाले, हटा पदावरून’ असा सारखा घोशा लावून बसलेत. अरे, माझ्या नसानसात संघ वसलेला. संस्थेचा विचार मी जेवढा करतो तेवढा कुणी करतो का? पुत्रवत प्रेम आहे माझे संस्थेवर. हे अतूट नाते तोडण्याचा प्रयत्न तुम्ही करताहात, पण त्यात तुम्हाला कधीच यश येणार नाही हे आरंभीच सांगून ठेवतो. काळानुरूप संस्थेत बदल व्हायला हवा. नव्या दमाचे कार्यकर्ते समोर आणायला हवेत हे मान्यच. आम्हीही हा बदल घडवून आणतच आहोत की! सप्तकची पाच पाच माणसे काय उगाच घेतलीत? त्यांच्याजवळ कार्यक्रमांचा भरपूर अनुभव आहे. नवे काही करण्याची जिद्द आहे. घेतलेले निवृत्तीधारक आहेत हा काय आमचा दोष? तसेही नव्या पिढीला साहित्याशी फार घेणेदेणे नसते. त्यामुळे जुन्यांवर विश्वास टाकला तर त्यात काय वाईट?

शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या संस्थेने अनेक कार्यकर्ते घडवले. वेळोवेळी त्यांच्यातली वैचारिक प्रगल्भताही दिसून आली. त्यांना संधी का नाही, असा आक्षेप घेतला जातो. अरे, ती प्रगल्भता, काम करण्याची जिद्द वगैरे सारे ठीक पण ही मंडळी आमच्या चौकटीत बसणारी हवी ना! आता तुम्ही म्हणाल की हा फारच संकुचितपणा झाला. अहो, संस्था चालवताना हे लक्षात घ्यावेच लागते. तरीही या संस्थेत वारसदारी नाही. जरा विदर्भातल्या इतर संस्था बघा. गांधींचे नाव घेत त्यांनी कशी स्वत:चीच वंशावळ समोर आणलीय. भविष्यात मी पायउतार झाल्यावर होणारा अध्यक्ष माझा नातेवाईक असणार नाही याची पाहिजे तर आताच हमी देतो. हे खरे आहे की त्याच त्याच म्हाताऱ्या लोकांच्या वावरामुळे संस्थेत स्थितीवादीपणा आलाय. कार्यक्रमांना गर्दी होत नाही. नवे कुणी जोडले जात नाही. अहो, म्हाताऱ्यांकडे वेळ असतो तेवढा तरुणांकडे असतो का? शिवाय त्यांना त्यांचीही व्यवधाने असतात. आणि गर्दीचे म्हणाल तर ती आजकाल कुठेच नसते. त्या गिरीश गांधींच्या कार्यक्रमांना तरी असते का? तिथे आमच्यापेक्षा निश्चितच जास्त प्रेक्षक असतात हे मान्य पण तुडुंब म्हणावी अशी गर्दी नसतेच ना! बाकी कार्यक्रमाच्या वैविध्यतेत गांधी आमच्या समोर असतात. आमचे कार्यक्रम कमी पण, त्याचा संबंध म्हातारपणाशी जोडणे हे जरा अतिच नाही का? होय, मी आहे ८८चा. वयामुळे धड चालताही येत नाही. डोळ्यांना अंधूक दिसते. पण उत्साह कायम आहे ना! भलेही मी तीन चाकाच्या खुर्चीवरून वावरत असेल. संस्थेत वर्षांतून एकदोनदाच येत असेल पण घरूनही माझे सारे लक्ष असतेच. इतकी वर्षे अगदी निगुतीने संस्था सांभाळली आणि आता शतकी काळात बाहेर जा म्हणता! अरे, मी बाहेर पडलो तर संस्था दुभंगेल. आज ओरडणाऱ्यांना तर तेच हवे आहे.

या ओरडय़ांचा संस्थात्मक अनुभव तरी काय? चालले दुसऱ्यावर टीका करायला? इतकी वर्षे साऱ्यांनी एकत्र काम केले. कसलाही वाद चव्हाटय़ावर आणला नाही तरी त्यातल्या काहींवर संशय, काहींकडून दुभंगाचा धोका, हे कसे असा प्रश्न तुम्हाला निश्चित पडला असेल. अहो, असतात प्रत्येक संस्थेत विद्रोही मनाची माणसे. आम्ही सांभाळून घेतोच की! त्यांच्या हाती संस्था देऊन नासाडी करून घेण्यापेक्षा मीच नेतृत्व केले तर त्यात काय वाईट? संस्था कोणतीही असो, त्यातले अंतर्गत वाद चव्हाटय़ावर यायलाच नकोत. बाहेरचे वार कितीही आले तरी चालतील. परतवून लावलाच ना त्या मनोहरचा वार यशस्वीपणे. त्यासाठी एक बेरकीपणा लागतो. धोरण व धूर्ततेच्या जवळ जाणारा. माझ्याशिवाय आहे का तो कुणात? शेवटी मीही औरंगाबादच्या पाटलांचा मित्र आहे बरं का? साहित्य व्यवहारात आपला, परका कोण हे बघावेच लागते. मग निर्णय घ्यावे लागतात. ही रीतच आहे सारस्वतांच्या वर्तुळात. तसे केले नाही तर वारंवार तमाशे होतात. आजकाल समाजमाध्यमांमुळे या तमासखोरांना जरा जास्तच चेव चढलाय. मी मात्र त्याची फिकीर करत नाही. काही म्हणतात मार्गदर्शकाच्या भूमिकेत जा. मला अडवाणी, जोशी अजिबात व्हायचे नाही. आणखी काही म्हणतात, वृद्धत्वाचा निकष तुम्हाला का लागू नाही. अरे, नेतृत्व हे कोणत्याही निकषाच्या पल्याड असते. आणि बदलाची प्रक्रिया नेहमी खालून सुरू होत असते. जेव्हा ती माझ्यापर्यंत येईल तेव्हा बघूच की! होय, मी पहिल्यांदा पद सांभाळताना म्हणालो होतो की चार वर्षांत संकुल पूर्ण करू. नाही पाळला गेला शब्द पण त्याला मी एकटाच दोषी कसा? हा व्याप मोठा आहे. त्यात अनेकांचे हात गुंतलेले. साऱ्यांना कामाला लावताना होतो विलंब कधी कधी? काहीजण हितसंबंध गुंतल्याचा आरोप करतात. तोही दबक्या आवाजात. आता एवढे मोठे काम पूर्णत्वाकडे न्यायचे म्हटल्यावर असे आरोप होणारच की! मी त्याची तमा बाळगत नाही.

कोणत्याही संस्थेत नेतृत्वबदल व नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची प्रक्रिया योग्यवेळी सुरू व्हायला हवी. अन्यथा संस्था मोडकळीला निघते हे सार्वजनिक जीवनातले वास्तव! पण माझ्या मते आमच्या संस्थेसाठी तरी अजून ती आलेली नाही. हे वाचताना तुम्ही माझ्या वृद्धत्वाचा विचार अजिबात करू नका. संस्थेचे शतक साजरे होईल व माझे सुद्धा, हे लक्षात ठेवा. संस्थेतील त्याच त्याच चेहऱ्यांमुळे नवे लोक जोडले जात नाहीत. कंपूशाही निर्माण होते हे आरोप फिजूल आहेत हो! जो आमच्या वैचारिक बंधनात बसणारा असतो तो बरोबर आमच्यापर्यंत पोहोचतोच. आणि कंपूशाहीचे म्हणाल तर ती कुठे नाही? प्रत्येक संस्थेत हेच चित्र आहे. मग आमच्यावरच साऱ्यांचा रोष कशासाठी? म्हणे, भावाला व व्यवस्थापकाला राहायला जागा दिली. अरे ते संस्थेसाठी किती झटतात हे ठाऊक आहे का तुम्हाला? दिवसरात्र राबतात बिचारे. आजकाल पैसे मोजूनही हे करायला कुणी तयार होत नाही. मग केले त्यांच्यावर थोडे उपकार तर बिघडले कुठे? भावाला अध्यक्ष थोडीच करतो आहे? आजकाल ग्रंथसहवासात रमतो तरी कोण? आहे का त्याच्याएवढा ध्यासपर्वी माणूस दुसरा? उगीच बोल लावता! म्हणे, आमची निवडणूक प्रक्रिया कुळाचार! मग काय चुरशीच्या, हाणामारीवाल्या निवडणुका होऊ द्यायच्यात का? त्यात काय शोभा राहील? अरे प्रत्येक संस्थेत अशीच निवडणूक होते. आणि उगीच ते लोकशाहीचे दाखले देऊ नका. संस्थेचा कारभार कसा समोपचाराने व सहमतीने चालला पाहिजे. या प्रक्रियेच्या काळात आमच्याकडे जे घडते ते खेळीमेळीने. तरीही एखादा नाराज झालाच तर ‘खास पद्धतीने’ समजूत काढण्यासाठी आहेच की मी! आमची संस्था म्हणजे कुटुंब आहे. आठ हजार लोकांचे. आता कुटुंबाला सांभाळण्यासाठी वडीलधारी हवाच ना! त्यामुळे उगीच वावडय़ा उठवू नका. म्हाताऱ्यांचा क्लब म्हणून हिणवू नका. पुढचा अध्यक्ष मीच असणार आहे. किमान शतकी संमेलनापर्यंत. या काळात कितीही संकटे आली तरी शारदेचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी!

(या आत्मनिवेदनाचा वि.सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकरांशी काहीही संबंध नाही. कुणाला तसे वाटल्यास तो योगायोग समजावा.)