नीरी परिसरात पहाटेच्या सुमारास घडला थरार

चंद्रपूर, तुकूम येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोरेश्वर ऊर्फ महेश महादेव वानखेडे (६१) यांचा शुक्रवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय पर्यावरण व संशोधन संस्थेच्या (नीरी) प्रवेशद्वारापासून ३०० मीटर अंतरावर निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून शैक्षणिक क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. वानखेडे यांनी अनेक वष्रे नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये (डीएनसी) नोकरी केली. त्यानंतर आठ वर्षांपूर्वी त्यांची चंद्रपूर येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झाली. ते रोज नागपूरहून चंद्रपूरला येणे-जाणे करीत होते. त्यांचे नरेंद्रनगर, म्हाडा कॉलनी परिसरात घर आहे. सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास महाविद्यालय असल्यामुळे ते नागपूरहून पहाटेच्या कोरबा-त्रिवेंद्रम एक्सप्रेसने चंद्रपूरला जायचे. शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ते एमएच-३१, बीसी-२२११ क्रमांकाच्या डीओ मोपेडने अजनी रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी निघाले. छत्रपती चौकातून अजनी, नीरी मार्गाने जात असताना नीरीच्या प्रवेशद्वारावर एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. ते गाडीसह २० फूट फरफटत गेले व एका झाडावर आदळले. त्यानंतर त्यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी गळा चिरून खून केला. एका व्यक्तीने या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली, त्यानंतर धंतोली पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, हद्द बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्यांना ही माहिती देण्यात आली. ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. दरम्यान उपायुक्त स्मार्तना पाटील, संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त सोमनाथ वाघचौरे, केशव शेंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

वानखेडे सामाजिक कार्यात अग्रेसर होते आणि इतर मागासवर्गाच्या संघटनेत सक्रिय होते. ते मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचे कुणाशीच वैर नसल्याचे सांगितले जाते.

कौटुंबिक कलहातून हत्या?

डॉ. वानखेडे हे पत्नी अनिता, मुलगी सायली आणि मुलगा तन्मय यांच्यासोबत राहात होते. अनिता या टेकडी गणेश मंदिर परिसरातील मॉडेल हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत. मुलीचे शिक्षण बी.एस्सी. पर्यंत झाले असून चार वर्षांपूर्वी तिने तेलंगखेडी परिसरातील पवन यादव या मुलाशी प्रेमविवाह केला. तिला तीन वर्षांची मुलगी आहे. पतीसोबत मतभेद झाल्याने ती वर्षभरापासून वडिलांकडेच आहे. मुलगा बारावीला आहे. १८ ऑक्टोबरला त्यांचा पत्नीसोबत वाद झाला होता. हे प्रकरण अजनी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली असावी, असे त्या दिवशी त्यांनी काढलेल्या ‘सेल्फी’वरून स्पष्ट होते. कौटुंबिक कलहातून त्यांचा खून झाला असावा, अशी शक्यता पोलीस वर्तवत आहेत.

आतापर्यंत शहरात ७३ खून

गेल्या काही दिवसांमध्ये शहरात खुनाचे सत्र सुरू असून गेल्या पंधरा दिवसांमध्ये राणाप्रतापनगर, जरीपटका, वाडी आणि आता बजाजनगर येथे खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. यंदा जानेवारीपासून ते ऑक्टोबपर्यंत ७१ खून झाले असून गेल्या तीन दिवसांत दोन खुनाच्या घटनांची नोंद झाली. मात्र, जानेवारी ते ऑक्टोबर २०१६ दरम्यान एकूण ७७ खून झाले होते.