महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वाघिणीसाठी जोडीदाराची आवश्यकता असतानाही अखेर चंद्रपुरातील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रातील वाघाला गोरेवाडा बचाव केंद्रात पाठवण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी हा वाघ गोरेवाडय़ात दाखल झाला.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात हा वाघ मरणासन्न अवस्थेत सापडला होता. चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या पशुवैद्यकाने अक्षरश: या वाघाला हातात धरून आणले. अवघे २.७ हिमोग्लोबिन असलेल्या वाघाचे हिमोग्लोबिन उपचारानंतर १३.३ टक्के इतके झाले. आठ ते नऊ महिन्यांचा हा वाघ जगण्याच्या स्थितीत आल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, मानवी सहवासाची आणि आयते खाद्य खाण्याची सवय लागल्याने तो मानवी वस्तीकडे जाण्याची भीती होती. त्यामुळेच त्याला पिंजऱ्यात किंवा प्राणिसंग्रहालयात ठेवण्याचा निर्णय याबाबत गठित समितीने घेतला. त्यावेळी काहींनी त्याला बोरिवलीला पाठवण्याचा विचारदेखील बोलून दाखवला. मात्र, महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वाघिणीसाठी नर वाघाची गरज असल्याने आणि गेली अनेक वष्रे वनखात्याच्या वाघांना या प्राणिसंग्रहालयाने आश्रय दिल्याने त्याठिकाणीच त्याची रवानगी व्हावी, असाही विचार काही सदस्यांनी बोलून दाखवला. मात्र, गरज असलेल्या ठिकाणी या वाघाची रवानगी न करता गोरेवाडय़ातच त्याची रवानगी करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रिटमेंटची चमू या वाघाला घेऊन गोरेवाडय़ात पोहोचली. या वाघाला नागपुरात आणण्याची तयारी सुरू असताना हा वाघ वाहतुकीच्या पिंजऱ्यात यायलाच तयार नव्हता. अथक प्रयत्नानंतर तो पिंजऱ्यात आला आणि नंतर नागपूरच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झाला.