मोदी-पवार निकटसंबंधांमुळे ‘सूचक मौन’?

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विशेषत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात जोरदार तोफ डागणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये मात्र त्यांच्यावर थेट किंवा वैयक्तिक टीका करणे शनिवारी टाळले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शरद पवार यांच्याशी निकटचे संबंध असल्याने आणि भाजपचे शिवसेनेविरोधातील संबंध बिघडत चालल्याने फडणवीस यांचे पवार कुटुंबीयांविरोधात बाळगलेले हे ‘सूचक मौन’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी काँग्रेसपेक्षा शरद पवार व विशेषत अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराविरोधात जोरदार टीका केली होती. ‘राष्ट्रीय भ्रष्टाचारी पक्ष’ अशी संभावना केली होती आणि सिंचन गैरव्यवहारावरून अजित पवार यांना लक्ष्य केले होते. जनतेचा पैसा लुबाडणाऱ्यांना तुरुंगात पाठविण्याच्या घोषणा निवडणुकीत केल्या होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सत्तेवर असताना केलेल्या गैरव्यवहारांचा फारसा उल्लेखही फडणवीस यांनी केला नाही. गेल्या दोन वर्षांत सिंचन गैरव्यवहाराच्या चौकशीत फारशी प्रगती झालेली नाही. उलट शरद पवार व मोदी यांच्यात जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. मोदी यांनी बारामतीत येऊन पवार यांच्या कृषी, सहकार क्षेत्रातील कामगिरीबाबत व राजकारणातील मुत्सद्देगिरीबाबत अनेकदा गौरवोद्गारही काढले आहेत.

बेहिशेबी मालमत्तेबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात कारवाई झाली असली तरी अजून अजित पवार यांच्याविरोधात काहीही पावले टाकण्यास फडणवीस सरकार धजावलेले नाही. त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात निवडणुकीत उगाचच रान उठवून सत्ता मिळविलेल्या भाजपच्या हाती पुढे काहीच लागलेले नाही. उलट खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या काही दिवसांत फडणवीस यांच्यावर अनेकदा वैयक्तिक टीकास्त्र सोडले आहे. ‘नळावरच्या बायकांप्रमाणे भांडतात, फारच चिडतात, त्यांच्याकडे हेल्मेट घालूनच जायला हवे,’ अशी टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली होती. पण फडणवीस यांनी त्याला प्रत्युत्तर दिले नाही.

निवडणुकीत वैयक्तिक टीकाटिप्पणीला अधिकच जोर चढतो. पण पवार यांच्या बारामतीत जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवार कुटुंबीयांविरोधात वैयक्तिक टीका करणेही टाळल्याने या सूचक मौनातून वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

फडणवीस यांनी बारामतीत बोलताना ‘नेत्यांची आणि कंत्राटदारांची नाही, तर जनतेची तिजोरी भरायची आहे, टक्केवारीने कंत्राटे देणाऱ्यांना मते देऊ नका’ असे सांगत पंतप्रधान मोदी यांच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाईला साथ देण्याचे आवाहन बारामतीकर जनतेला केले. मोदी व राज्य सरकारच्या कामगिरीला समर्थन देऊन मते देण्याचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाणी पाजण्याचे आवाहन केले.

भाजपचे शिवसेनेविरोधातील संबंध बिघडत असून आगामी मुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. या निवडणुकीच्या निकालाचे राजकीय पडसाद उमटणार आहेत. शिवसेनेच्या पाठिंब्यावर फडणवीस यांचे सरकार सत्तेवर असले तरी निकालानंतर शिवसेना कोणती पावले उचलेल याची खात्री नाही. फडणवीस सरकारला बहुमत नसताना राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतहून बाहेरून पाठिंबाही जाहीर केला होता. त्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार करून फडणवीस यांनी पवार कुटुंबीयांवर वैयक्तिक टीका करणे टाळून ‘तलवार म्यान’ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.