नागपूर महापालिकेच्या चाव्या कुणाच्या हाती लागणार याचा फैसला करणारी निवडणूक पुढील महिन्यात होत असून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. काँग्रेसला सलग दहा वर्षे सत्तेतून बाहेर राहावे लागले आहे, तर युती तुटल्याने शिवसेना आक्रमक झाल्याचे दाखवत आहे, परंतु शहरात काँग्रेसशिवाय भाजपला आव्हान देणारा दुसरा प्रबळ पक्ष दिसून येत नाही.

गेल्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीची स्थिती सुधारली असली तरी निर्णायक भूमिकेत अजून हा पक्ष आला नाही. राष्ट्रवादीला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही तर शिवसेनाही फार काही करिश्मा करू शकलेले नाही. त्यामुळे भाजपचे कमळ कोमेजवण्यासाठी काँग्रेसला एकहाती विडा उचलवावा लागणार आहे.

भाजपने याआधीच गुप्त पद्धतीने सर्वेक्षण करून यादी तयार केली आहे, परंतु पक्षात बंडखोरी होईल म्हणून यादी लांबणीवर टाकली आहे. शिवसेना युती तुटल्याचा आनंद व्यक्त करण्यात मश्गूल असून अद्याप उमेदवार निवडण्यात आलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल देशमुख यांनी देखील महापालिकेतील असलेली शक्ती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मुस्लीम लिगसोबत आघाडी करून सकारात्मक पाऊल टाकले आहे, परंतु हा पक्ष दुसरा आकडा गाठेल की नाही, याबाबत साशंकता आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने तसेच महापालिकेत सलग दहा वर्षे असलेल्या भाजपला स्वबळावर सत्ता काबीज करायची आहे. दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या मुद्यांच्या अधिकाधिक मारा करून भाजपच्या ‘कमळ’ला कोमेजवण्याचे ‘लक्ष्य’ काँग्रेस, बसप आणि शिवसेनेचे आहे.

काँग्रेसची व्यूहरचना, सत्ता कायम ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न

नागपुरात पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करण्यासाठी काँग्रेसची व्यूहरचना सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेसच्या अंर्तगत भांडणातून मिळेल तितका फायदा घेत सत्ता कायम ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी मात्र अंतर्गत कलहाकडे फार लक्ष न देता बुथ स्तरापासून संघटना बांधणी आणि निवडणुकीचे नियोजन केले. उमेदवारी निवडीची यादी देखील प्रदेशाध्यक्षांना सादर करून आले आहेत. अंतिम यादी २ किंवा ३ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येईल. बसप वर्षभरापासून तयारी करत आहे. त्यांनी सर्वात प्रथम उमेदवार जाहीर केले आहेत, परंतु अद्याप त्यांचे प्राबल्य असलेल्या प्रभागातील यादी जाहीर केलेली नाही.