निवडणुकीतील पराभवातून अद्यापही न सावरलेल्या काँग्रेसच्या शहर शाखेने आता संघटनात्मक पातळीवर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. त्यात प्रभाग आणि वॉर्ड समिती अध्यक्ष नियुक्तयांबाबत चर्चा करण्यात आली.
महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्याच्या कक्षात झालेल्या बैठकीत शहर काँग्रेसचे पदाधिकारी व ब्लॉक अध्यक्ष यांच्यासह इतरही स्थानिक नेते उपस्थित होते. आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी संघटना मजबूत करण्याचे निर्देश प्रदेश काँग्रेसने स्थानिक शाखांना दिले आहेत. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली.
बैठकीत वॉर्ड आणि प्रभाग समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच प्रमाणे११ पदाधिकाऱ्यांची कामकाज समिती स्थापन करण्यात आली.
यात पक्षाचे शहर सरचिटणीस बंडोपंत टेंभूर्णे, डॉ. गजराज हटेवार, तुफैल अशर, उमेश साहू, विजय बाभरे, रत्नाकर जयपूरकर, हरिष खंडाईत, संदेश सिंगलकर, चंद्रकांत बडगे, हेमराज वानखेडे, प्रा. अनिल शर्मा यांचा समावेश करण्यात आला.
बैठकीला प्रदेश सचिव तानाजी वनवे, शहर सरचिटणीस कमलेश समर्थ आदी  पदाधिकारी उपस्थित होते.