काँग्रेसचे खासदार प्रा. राजीव गौडा यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीत जनतेला अनेक स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली. मात्र, चार वर्षांच्या कार्यकालाकडे नजर टाकल्यास सर्वसामान्यांच्या हिताचा एकही निर्णय ते घेऊ शकलेले नाहीत. केवळ  त्यांच्या  मित्रांशिवाय त्यांनी कोणाचेही भले केले नाही. अजूनही त्यांची तिच ‘जुमलेगिरी’ सुरू असून त्याला मर्यादाच उरलेली नाही, असे मत काँग्रेसचे कर्नाटकातील  खासदार प्रा. राजीव गौडा यांनी व्यक्त केले.  प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अ.भा. काँग्रेस समितीच्या संशोधन विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अमोल देशमुख उपस्थित होते.

गौडा म्हणाले, मोदींनी देशाचा विकास तर केलेलाच नसून, चार वर्षे वाया घालवली. आता सरकारचा अंतिम एक वर्षांचा कार्यकाल  बाकी असून त्यातूनही फारशी अपेक्षा नाही. पुढील वर्षी निवडणुका असल्याने मोदींची ‘जुमलेगिरी’ परत सुरू झाली असून यंदा त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही. नोटाबंदी,  जीएसटीच्या निर्णयाची अमंलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरले असून यामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला. उद्योगधंदे ठप्प पडले. कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. परिणामी, भारताचा विकासदर खाली घसरला. दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देणार अशी मोदींची घोषणाही फोल ठरली. देशात बेरोजगारीचा मोठा प्रश्न असताना सरकार केवळ कागदावरच उद्योगाची आखणी करीत आहे, असे गौडा यांनी सांगितले.

मोदी भ्रष्टाचारमुक्त भारताची गोष्ट करत असताना राफेल,पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यांमध्ये सरकार अडकली आहे. हे सर्व जनता बघत असून त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येईल, असे गौडा म्हणाले.

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीनंतर मोदी सरकारचा खेळ संपुष्टात येणार असून राहुल गांधी पंतप्रधानपदाचे आमचे दावेदार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  गुजरात विकास प्रारूपाची स्तुती होत असताना जेव्हा आम्ही त्याचे सर्वेक्षण केले तेव्हा मूठभर लोकांच्या ते फायद्याचे असल्याचे दिसून आले. तळागळातील अदिवासी, छोटे उद्योजक यांना त्यातून डावलले गेले असून नेमके तसेच चित्र राष्ट्रीय पातळीवर दिसत आहे, असेही ते म्हणाले.