काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची नागपुरात एकत्रितपणे पहिल्यांदाच सभा होत असून ही सभा अभूतपूर्व करण्यासाठी काँग्रेसने रविभवनात ‘नियंत्रण कक्ष’ स्थापन केला आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद रणपिसे यांच्याकडे या कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षांचा सांगता समारोह नागपुरात कस्तुरचंद पार्कवर आयोजित केला आहे. यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी नागपुरात येत आहेत. या सभेच्या तयारीला प्रदेश काँग्रेस लागली आहे. सभेला राज्याभरातून कार्यकर्ते येणार आहेत. परंतु मुख्य जबाबदारी विदर्भातील काँग्रेस नेत्यांवर आहे. नागपूर शहराची जबाबदारी माजी खासदार विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर आहे तर नागपूर ग्रामीणची जबाबदारी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. उर्वरित १० जिल्ह्य़ांत स्थानिक आमदार, जिल्हाध्यक्षांना सभेसाठी कार्यकर्त्यांना सुसज्ज करावयाचे आहे. काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पासेस देण्यात येणार आहेत. पासेस तयार झाल्या असून उद्या बुधवारपासून त्या वितरित करण्यात येतील. होर्डिग, बॅनरचे वाटप केले जाणार आहे. या सर्व तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी रविभवनातील कॉटेज क्र. २१मध्ये काँग्रेसने सोमवारपासून नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. सोनिया गांधी यांनी यापूर्वी कुस्तरचंद पार्कवर सहा सभा घेतल्या आहेत. सोनिया गांधी यांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये कस्तुरचंद पार्कवर राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या शुभारंभ केला होता. केंद्रात भाजप सरकार आल्याने देशात असहिष्णू वातावरण असून दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकाच्या कल्याणकारी योजनांना नख लावण्यात येत आहे, असा आरोप सातत्याने काँग्रेस करीत आहे. राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चालवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या पाश्र्वभूमीवर ११ एप्रिलला होणारी सभा देखील दिमाखदार व्हावी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याच्या मुख्यालयातून आव्हान मिळावे, अशी योजना काँग्रेसची आहे. पक्षाचे प्रमुख आणि अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीतील नेते सभेला राहणार आहेत. त्यादृष्टीने काँग्रेसने सभेचा पूर्व आढावा बैठक घेतली आहे. शिवाय विधानसभा, जिल्हानिहाय जबाबदारी वाटून देण्यात आल्या आहेत.
शहर काँग्रेसच्या वतीने १ ते ६ एप्रिल अशा विधानसभा निहाय बैठका घेण्यात येत आहेत. पश्चिम नागपुरात आज बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात उद्या बुधवारी काँग्रेसची बैठक होत आहे. त्यानंतर प्रभागनिहाय बैठकांना प्रारंभ होणार आहे. प्रत्येक प्रभागातून किमान ५०० लोकांना सभेला आणण्याची जबाबदारी नगरसेवकाला देण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक लढलेल्या उमेदवाराला आणि ब्लॉक अध्यक्षाला स्वतंत्रपणे कार्यकर्ते जमा करण्याची सूचना देण्यात येत आहेत. प्रदेश काँग्रेसने तीन लाख लोक गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे माजी मंत्री नितीन राऊत म्हणाले.

विमानतळावरून थेट दीक्षाभूमीवर
डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षांचा सांगता समारंभ ११ एप्रिलला कस्तुरचंद पार्कवर आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने सोनिया गांधी यांची जाहीर सभा होत आहे. सोनिया गांधी विशेष विमानाने सायं. ५ वा. नागपुरात येतील. विमानतळावरून थेट दीक्षाभूमीला जातील.