सदरच्या ‘व्ही ५’मधील घटना
नागपूर : पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने पबमध्ये युवकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना सदर पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली आहे. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास माऊ ंट रोडवरील व्ही फाइव्ह लोकल्स पब येथे घडली. या मारहाणीत शोएब अहमद (२९) रा. जागनाथ बुधवारी याच्या हाताला गंभीर मार लागला.
याप्रकरणी आदित्य ठाकूर, शुभम शरद जैन व त्याच्या साथीदारांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. आदित्य हा पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. शनिवारी रात्री शोएब, त्याचे मित्र फहाद अली, जुनैद शेख व सलमान खान पबमध्ये गेले. यावेळी आदित्य, शुभम व त्याचे साथीदारही तेथे आले. आदित्य याने बीअर हवेत उडवली. ती शोएबच्या अंगावर पडली. शोएब याने आदित्यला हटकले. त्यामुळे आदित्य संतापला. आदित्य व त्याच्या साथीदारांनी शोएबला मारहाण केली. शोएबच्या मदतीसाठी जुनैद धावला. आदित्यने त्यालाही मारहाण केली. त्यानंतर आदित्य व त्याचे साथीदार तेथून पसार झाले. या मारहाणीदरम्यान आदित्य व त्याच्या साथीदारांनी जुनैद याच्या गळ्यातील चार तोळ्यांची सोनसाखळी हिसकावल्याचा आरोपही शोएबने आपल्या तक्रारीत केला आहे. आदित्य हा पोलीस मुख्यालयात तैनात आहे. सोनसाखळी हिसकावल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. सीसीटीव्ही फुटेजमध्येही सोनसाखळी हिसकावण्यात आल्याचे दिसत नाही. शोएबच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्यची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिली.