यशोधरानगरमध्ये गुन्हा दाखल

नागपूर : सदाचाऱ्यांचे रक्षण व दुर्जनांचा नायनाट करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस शिपायानेच एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून विनयभंग केला. ही धक्कादायक घटना यशोधरानगर पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला निलंबित करण्यात येणार आहे.

रमेश गाढवे असे आरोपी हवालदाराचे नाव आहे. पीडित १३ वर्षांच्या मुलगी लहान बहिणीसह घरात टीव्ही बघत होती. दरम्यान, आरोपी पोलीस हवालदाराने  तिच्याशी अश्लील चाळे केले. तिने आरडाओरड केल्याने आरोपी  पळून गेला. दोन्ही मुली भेदरलेल्या असल्यामुळे त्यांनी वडिलांना काही सांगितले नाही. मात्र, सायंकाळी  आई घरी परतताच सर्व हकिगत सांगितली. गुरुवारी गाढवे याला घरी बोलावून विचारणा केली असता त्याने अरेरावीची भाषा वापरली. पोलीस असल्याने आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही, अशा शब्दात त्यानेच पीडित कुटुंबाला धमकावले. तेव्हा महिलेने मुली व पतीला घेऊन यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक साखरे यांनी पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांना कळवले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विभागीय प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला निलंबित करण्यात येणार आहे.