मंत्री विजय वडेट्टीवार यांचा आरोप

नागपूर : महाराष्ट्रात चाचण्या अधिक होत असल्याने करोनाबाधितांचे  प्रमाण जास्त दिसून येते. पण भाजपशासित राज्यात करोना बाधितांचे आकडे लपवले जाते, असा आरोप मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे केला. खरीप आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रातील करोनाबाधितांचे कमी होणारे प्रमाण आभासी असल्याची टीका विरोधी

पक्षाकडून केली जात आहे. याकडे वडेट्टीवार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, राज्यातील आकडे हे खरे आहेत. येथे कुठलीही लपवाछपवी नाही. आरटीपीसीआर चाचण्यांवर अधिक भर दिला जात असल्याने रुग्णसंख्या अधिक दिसत आहे. त्याच्यावर उपचाराचे नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहे. या उलट भाजपशासित राज्यातील स्थिती आहे. उत्तर प्रदेशातील आमदाराच्याच पत्नीला उपचार मिळत नसल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावरून तेथील स्थितीची कल्पना येते, असे वड्डेट्टीवार म्हणाले.

तिसऱ्या लाटेसाठी प्राणवायूचे नियोजन

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. यासाठी ८०० कोटी रुपये खर्च करून प्राणवायू घेण्यात आला आहे. १६०० मे.टनपर्यंत प्राणवायूची मागणी जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. राज्यभर प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले आहे. वाढती गरज लक्षात घेऊन २५ हजार मे.टन प्राणवायू साठवण्याचे नियोजन आहे. गावागावांमध्ये खनिज निधीतून विलगीकरण केंद्र सुरू केले जात आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी उत्पादक कंपन्यांसोबत करार केले जात आहे, असे वड्डेट्टीवार म्हणाले.

लस, प्राणवायूसाठी केंद्राला पैसे मोजले

केंद्र सरकारने राज्य सरकारला लस आणि प्राणवायूची मदत केली असे सांगितले जात असले तरी राज्य सरकारने त्यासाठी केंद्राला पैसे दिले आहेत,याकडे त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रातून केंद्राला मिळणाऱ्या महसुलाच्या प्रमाणात केंद्राकडून मिळणारी मदत कमी आहे