महापालिकेसमोरील अडचणी वाढल्या

नागपूर : शहरातील  उच्चभ्रू भागांमधील सोसायटी आणि अपार्टमेंटमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता  अनेक झोपडपट्ट्यांमध्ये करोनाचा शिरकाव होताना दिसत आहे. दाट वस्ती असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये संपर्कात आलेल्यांचा शोध घेताना एका झोपडपट्टीतून किमान २० ते २५ बाधित आढळून येत  असल्यामुळे महापालिका प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

मार्च महिन्यात शहरात उच्चभ्रू वस्त्यांमध्ये करोनाचे रुग्ण जास्त आढळून येत होते. त्यामुळे झोपडपट्टीकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाठोडा परिसरातील संघर्षनगर, इंदिरानगर, नंदनवन भागातील झोपडपट्टी परिसरात रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा महापालिकेकडून शोध घेणे सुरू झाले. आता शहरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळे तेथे जास्त रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या नंदनवन, गुलशननगर, सूर्यनगर, भानखेडा, गंगाबाई घाट, शिवाजीनगर, काचीपुरा, शांतीनगर, डिप्टी सिग्नल, भांडेवाडी, नंदनवन, डिप्टी सिग्नल, पारडी, वाठोडा, जयताळा, पांढराबोडी, कृष्णानगर, शीलानगर, रमाईनगर, सिरसपेठ, बजरंगनगर, पँथरनगर झोपडपट्टी, इंदिरा गांधी नगर झोपडपट्टी, कृष्णानगर, कुशीनगर, गुलशननगर, पिवळी नदी ओव्हर ब्रीज, चांभार नाल्याजवळील परदेशी मोहल्ला, डोबीनगर, खदान, इंदिरा गांधी नगर, लष्करीबाग, बंदे नवाजनगर, विनोबा भावे नगर, न्यू मंगळवारी, शांतीनगर, राहुलनगरमध्ये बाधित आढळत आहेत. एकीकडे शहरात खाटा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही तर दुसरीकडे झोपडपट्टीमध्ये  रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बहुतांश नागरिक गृहविलगीकरणात आहेत. काही भागात  कठडे लावत परिसर बंद केले आहेत. मात्र तेथे सुरक्षारक्षक नसल्याने लोक कठडे बाजूला सरकवून बाहेर पडत आहेत.

काही भागातील झोपडपट्टीमध्ये करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र प्रशासनाकडून झोनपातळीवर तेथील बाधितांना औषधे दिली जात आहे. परिसर निर्जंतुकीकरण सुरू आहे. बहुतेकांमध्ये करोनाची लक्षणे कमी असल्यामुळे त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.  – राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.