प्रवाशांची तपासणी, गृहविलगीकरण बंद

नागपूर : दिल्लीत करोनाची दुसरी लाट आली असून बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तिथून नागपुरात येणाऱ्या रेल्वे आणि विमान प्रवाशांची वैद्यकीय तपासणी किंवा गृहविलगीकरण होत असल्याने शहरात करोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बेंगळुरू, चेन्नई आणि बिलासपूर- नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेससह दररोज नागपुरात १३ रेल्वेगाडय़ा येतात. दररोज सरासरी ४५० ते ५०० प्रवाशी दिल्लीहून नागपुरात येतात.

या प्रवाशांची नागपूर स्थानकावर तपासणी होत नाही. केवळ त्यांची नोंद घेतली जाते. दिल्लीतून येणाऱ्यांपैकी बाधिताच्या संपर्कातील कोणी असल्यास त्यांच्यामुळे नागपुरात पुन्हा आजार पसरू शकतो. तिकडे रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रििनग तसेच हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का लावणे बंद केले आहे.

विमानाने येणाऱ्या प्रवाशांचेही असेच चित्र आहे. एअर इंडिया आणि इंडिगोची दोन्ही विमाने दररोज ८० टक्क्यांहून अधिक प्रवासी घेऊन नागपुरात येतात. १८० आसन क्षमतेच्या विमानात सरासरी १५० ते १६० प्रवासी दररोज दिल्लीहून नागपुरात येत आहेत. त्यांची थर्मल स्क्रिनिंग केली जाते, असा दावा प्रशासनाचा आहे. मात्र, गृह विलगीकरणाचा शिक्का लावणे बंद झाले आहे. याचा अर्थ सध्या दिल्लीहून नागपुरात येणाऱ्या प्रवाशांपासून नागपुरात करोना वाढू नये, अशी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. दिल्लीत बाधितांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत हे धोकादायक ठरू शकते, असे मत भारतीय प्रवासी यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंतकुमार शुक्ला यांनी व्यक्त केले.

नागपूरहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे  थर्मल स्क्रििनग केले जाते. परंतु बाहेरगावाहून नागपुरात येणाऱ्यांची केवळ माहिती गोळा केली जात आहे, असे सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस.जी. राव यांनी सांगितले.