२४ तासांत ८ मृत्यू; ६९१ नवीन रुग्ण

नागपूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर ६९१ नवीन रुग्णांची भर पडली. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या थेट ६,४६८ वर पोहोचली आहे.

सक्रिय रुग्णांमध्ये शहरातील ५,२९०, ग्रामीण १,१७८ अशा एकूण ६,४६८ रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्णांपैकी गंभीर संवर्गातील १,१३७ रुग्णांवर विविध रुग्णालयांत तर ४,६४० रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. रुग्णालयांतील गंभीर रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, मंगळवारी शहरात दिवसभरात ५५१, ग्रामीणला १३८ असे एकूण ६९१ रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख १५ हजार ४२०, ग्रामीण २८ हजार १८४, जिल्ह्याबाहेरील ९३० अशी एकूण १ लाख ३३ हजार ७७५ रुग्णांवर पोहोचली.  दिवसभरात शहरात ५, ग्रामीण १, जिल्ह्याबाहेरील २ असे एकूण ८ मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २,७७६, ग्रामीण ७६७, जिल्ह्याबाहेरील ७४८ अशी एकूण ४,२९१ रुग्णांवर पोहोचली.   दिवसभरात शहरात ४२५, ग्रामीण ५२ असे एकूण ४७७ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ७ हजार ३५४, ग्रामीण २६,४२१ अशी एकूण १ लाख ३३ हजार ७७५ व्यक्तींवर पोहोचली.

शहरातील विविध भागात चाचणी शिबीर

शहरातील हॉटस्पॉट क्षेत्रातील बाजारपेठेत, सोसायटी तसेच अन्य विभागात विशेष करोना चाचणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशान्वये  व आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांचा मार्गदर्शनात या शिबिरांचे आयोजन  तहसील पोलीस ठाणे गांधीबाग, स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य कार्यालय, आई.बी.एम.सिव्हिल लाईन्स, लोणारा येथील सेन्ट्रल इंडिया कॉलेजमध्ये करण्यात आले.  दूध विके्रता, भाजी विक्रेता, घरकाम करणाऱ्या मोलकरीण यांची सुद्धा चाचणी करण्यात येत आहे. झोनल वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात डॉ. शुभम मनगटे, डॉ. सागर नायडू, डॉ. साहिल अंसारी, डॉ. मोनाली कायरकर, डॉ. आशीष हरणे यांनी नागरिकांची करोना चाचणी केली.

संस्था, संघटनांचे विविध कार्यक्रम रद्द

करोना रुग्णांची वाढती संख्या बघता विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्यावतीने आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गिरीश गांधी फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी साहित्य क्षेत्रात कार्यरत विदर्भातील मान्यवरांचा सत्कार केला जातो. यंदा २८ फेब्रुवारीला  राष्ट्रभाषा संकुलाच्या बाबुराव धनवटे सभागृहात हा साहित्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तो रद्द करण्यात आला आहे. याशिवाय भारतीय जनता पक्षाच्यावतीने सुरेश भट सभागहात मंगळवारी आयोजित केलेला महिला आघाडीचा मेळावा, सप्तकच्या वतीने २७ व २८ फेब्रुवारीला पर्सिस्टंट सभागृहात आयोजित दोन दिवसीय सी. आर. व्यास संगीत महोत्सव रद्द करण्यात आला आहे. सांस्कृतिक संचालनालयाच्या सहकार्याने लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ते सुद्धा  रद्द करण्यात आले आहे.

अग्निशमन यंत्रणेसाठी निधी मिळणार

करोनाचे रुग्ण वाढत असल्याने  मेडिकल, मेयो या दोन्ही  रुग्णालयांसह महापालिकेच्या रुग्णालयांचे तातडीने अग्निशमन आणि सुरक्षा अंकेक्षण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मंगळवारच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. डॉ. संजीव कुमार म्हणाले, या रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांसाठी अतिरिक्त सुविधा निर्माण केल्या आहेत. त्या इमारतींचेही फायर व सेफ्टी ऑडिट बंधनकारक आहे. यासाठी लागणारा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अथवा जिल्हा नियोजन विकास निधीमधून उपलब्ध केला जाईल. यासाठी अतिरिक्त निधीची मागणीसुद्धा करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, सर्व रुग्णालयात ऑक्सिजनसह आवश्यक औषधांचा मुबलक पुरवठा असावा यासाठीचे नियोजन संबंधित अधिकाऱ्यांनी करावे. जिल्’ात विविध शासकीय व खाजगी रुग्णालयात एक हजारपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असून, रुग्णसंख्येतील अपेक्षित वाढ लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

चाचण्यांचा  पुन्हा उच्चांक

शहरात दिवसभरात ६,८३०, ग्रामीणला ४,१६६ अशा एकूण १० हजार ९९६  चाचण्या करण्यात आल्या. हा आजपर्यंतच्या २४ तासांतील चाचण्यांचा उच्चांक आहे. यापूर्वी २० फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्ह्यात ९,२२५ चाचण्या झाल्या होत्या.