अनेक वस्त्या प्रतिबंधित करण्याच्या दृष्टीने हालचाली

नागपूर :  करानोच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक बाधित लक्ष्मीनगर तर मृत्यू मंगळवारी झोनमध्ये झाले आहेत. मार्च महिन्यात शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये करोनाबाधित वाढले. फेब्रुवारी महिन्यात ७८ बाधितांचे मृत्यू होते तर मार्च महिन्यात तब्बल ४७२ रुग्णांचे करोनामुळे निधन झाले आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक रुग्ण ८६१७ धरमपेठ झोनमध्ये तर ६१ मृत्यू मंगळवारी झोनमध्ये नोंदवण्यात आले. धरमपेठ झोनमध्ये फेबु्रवारीत १ हजार ६३९ करोना रुग्ण असताना मार्चमध्ये मोठी वाढ झाली. विशेषत:  लक्ष्मीनगर, हनुमाननगर व मंगळवारी झोनअंतर्गत अनेक वस्त्यांना प्रतिबंधित क्षेत्र करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहे.

शहरात करोनारुग्णांचा शोध घेण्यासाठी आरआरटी पथक व महापालिकेच्या दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित झोनमध्ये तक्रारींचा निपटारा केला जात आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची व मृत्यूची संख्या वाढली आहे. फेब्रुवारीत मंगळवारी झोनमध्ये १७३४ रुग्ण आणि १२ मृत्यू असताना मार्च महिन्यात ८३२० रुग्ण आणि ६१ मृत्यू झाले. शिवाय लक्ष्मीनगर झोनमध्ये फेब्रुवारी महिन्यात २ हजार ६०७ रुग्ण आणि १४ मृत्यू असताना मार्च महिन्यात ८२७२ रुग्ण आणि ४३ मृत्यू झालेत. हनुमाननगर झोनमध्ये फेब्रुवारी महिन्यात १६३९ करोनाबाधित रुग्ण तर मृत्यू १७ होते आणि मार्च महिन्यात ८ हजार ६१७ रुग्ण आणि ५७ मृत्यू झाले.

शहरात महापालिकेची पाच करोना रुग्णालये असून सर्वच रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत. आमदार निवास, व्हीएनआयटी आणि पाचपावली पोलीस निवास केंद्र ही तीन विलगीकरण केंद्रे आहेत. मात्र या तीनही ठिकाणी एकूण २१० रुग्ण सध्या विलगीकरणात आणि २७ हजारपेक्षा जास्त रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.  गेल्यावर्षी सर्वाधिक बाधित असलेल्या सतरंजीपुरा झोनमध्ये केवळ १६०८ रुग्ण आणि २१ मृत्यू आहेत. यात सतरंजीपुरा परिसरातील केवळ ६ लोकांचा समावेश आहे.  शहरात दररोज सात ते आठ हजार लोकांची करोना चाचणी होत असल्यामुळेही रुग्णसंख्या वाढत आहे. महापालिका प्रशासन जनजागृती, रुग्णालयातील खाटांची, डॉक्टरांची व परिचारिकांची संख्या वाढवण्याच्या तयारीत आहे.