कामगार संघटनांचा दावा; कर्तव्यावर येणे बंधनकारक केल्याचा आरोप

नागपूर : अंबाझरी दारूगोळा निर्मिती कारखान्यातील कामगार करोनाचे बळी ठरत असूनही त्यांना कर्तव्यावर येणे बंधनकारक करण्यात आले आहे. कामगार संघटनांनी आजवर २० ते २५ कामगारांचा मृत्यू झाल्याचा दावा के ला असून कारखान्यात करोनाचे दिशानिर्देश पाळले जात नसल्याची तक्रार आमदार, खासदारांना के ली आहे. राज्यात टाळेबंदी लावण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात केवळ १५ टक्के कर्मचारी बोलावण्यात यावे, असे आदेश आहेत. मात्र, अंबाझरी दारूगोळा निर्मिती कारखान्यात ५० ते ६०  टक्के कर्मचाऱ्यांना बोलावण्यात  येत आहे. त्याचा परिणाम म्हणून दररोज एक ना एक कर्मचारी करोनाचा बळी ठरत आहे. आजवर २० ते २५ कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे   कर्मचारी आणि त्यांच्या कु टुंबीयांमध्ये दहशत आहे.

यासंदर्भात सर्व कर्मचारी संघटना आणि त्यांच्या कु टुंबीयांनी कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्यात यावी  किं वा तात्पुरत्या स्वरूपात काम बंद ठेवावे, अशी मागणी प्रशासनाकडे के ली. कारण, अंबाझरी दारूगोळा कारखान्यात सध्या कोणत्याही प्रकारचे अत्यावश्यक उत्पादन सुरू  नाही. परंतु  प्रशासन याबाबत कु ठलाही निर्णय घेण्यास असमर्थता व्यक्त करत आहे, असे संयुक्त  संघर्ष समिती, आयुध निर्माणी अंबाझरी यांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

प्रशासनाकडून कबुली अतिरिक्त महाव्यवस्थापक  (प्रशासन) राजेश भिडे  यांनी १० ते १२ कर्मचारी करोनामुळे मरण पावल्याचे मान्य  केले. परंतु त्यांनी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्याशिवाय काम बंद करता येणार नसल्याचे म्हटले आहे. कर्मचारी वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर  बोलावण्यात येत आहे. बाहेर राहणाऱ्यांना आवश्यकतेनुसार बोलावण्यात येत आहे. आम्हाला ५० टक्के कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर बोलावण्याचे आदेश आहेत, असेही ते म्हणाले.

रेल्वेच्या मोतीबाग कार्यशाळेत सहा जणांचा मृत्यू

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या मोतीबाग कार्यशाळेत देखील करोनाचे रुग्ण वाढत असून आजवर सहा जणांचा मृत्यू झाल्याचे कामगार संघटनांनी म्हटले आहे. १५ टक्के कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर बोलावण्यात यावे, अशी मागणी कामगार युनियनची आहे. प्रशासन मात्र ५० टक्केच्या नियमावर बोट ठेवत आहे.