पालकमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन; शहरातील स्थिती नियंत्रणात

नागपूर : करोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून शहरात ‘लॉकडाऊन’ (जीवनावश्यक सेवा वगळता सर्व सेवांवर बंदी) करण्यात आले आहे. या काळात नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिले.

करोना विषाणूचा प्रसार संसर्गातून होत असल्याने प्रशासनाने सुरुवातीला गर्दी होणारी ठिकाणे बंद केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात १४४ कलम लागू करण्यात आले. मात्र त्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी होणारी वर्दळ अपेक्षेइतकी कमी होत नसल्याने राज्यशासनाने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड सह नागपुरातही शुक्रवारी मध्यरात्रीपासून  ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात  जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या सेवा व सुविधांचा अपवाद सोडला तर सर्व सेवा बंद केल्या जातील. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नितीन राऊत यांनी केले.

करोना संशयितांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला विभागीय आयुक्त संजीवकुमार, पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित होते.

 काय आहे लॉकडाऊन’?

*   जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या सेवांचा अपवाद सोडला तर सर्व सेवा बंद करण्यात येतील.

*   दिवसा किंवा रात्रीही कामाशिवाय नागरिकांना बाहेर पडता येणार नाही.

*   खासगी / सार्वजनिक वाहतूक बंद राहील

*   दवाखाने, औषधाची दुकाने सुरू राहतील.

*   सार्वजनिक ठिकाणांवरील वर्दळीवर प्रतिबंध

*   नागरिकांच्या प्रभातफेरीवरही बंदी

बाहेरगावहून येणाऱ्यांची तपासणी

बाहेरगावहून नागपुरात येणाऱ्यांची टोल नाक्यावर तपासणी केली जाईल. तो संशयित आढळल्यास त्याला शहरात प्रवेश करू दिला जाणार नाही. सुरक्षेची उपाययोजना म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. शहरातील नागरिकांना याचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.