आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

वाईन शॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध पोलिसांत खोटी तक्रार देऊन गुन्हा दाखल करविल्याने एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हॉटेल हरदेवच्या मालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल हरदेवचा मालक विशाल जयस्वाल, व्यवस्थापक शेखर सोनकुसरे आणि शेखर बोरकर रा. मस्कासाथ अशी आरोपींची नावे आहेत. अतुल प्रभाकर ठवरे (२९) रा. नेताजीनगर असे मृताचे नाव आहे. विशाल जयस्वाल यांचे हरदेव हॉटेलसह पंचशील चौकातील बार, वाईन शॉप व इतर मद्यविक्रीची प्रतिष्ठाने आहेत. अतुल हा सीताबर्डीतील मधुर वाईन शॉपमध्ये काम करीत होता. मे महिन्यात अतुलच्या भावाचे लग्न होते. त्याकरिता त्याने चार दिवसांची सुटी घेतली होती. सुटीनंतर तो कामावर परतला असता व्यवस्थापक शेखर सोनकुसरे याने त्याला कामावर न येण्याचे आदेश दिले. तेव्हापासून तणावात होता. दरम्यान, त्याच्याविरुद्ध वाडी पोलीस ठाण्यात ५० लाख रुपयांची खंडणी मागण्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे तो चिंतेत होता व २० ऑगस्टला त्याने घरातील छताच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. कळमना पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यानंतर मनीषा अतुल ठवरे (२७) यांच्या तक्रारीवरून  तपास करून तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला.

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील तिघांना अटक

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील तिघांना अटक करण्यात मानकापूर पोलिसांना यश आले. अंधाराचा फायदा घेऊन त्यांचे तीन साथीदार पळून गेले. तिघांकडून एक देशीकट्टा, जीवंत काडतुस, चाकू आणि दुचाकी असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रविवारी संध्याकाळी मानकापूर पोलिसांचे पथक रात्री गस्त घालत होते. त्यावेळी इंदिरा मातानगर झोपडपट्टीच्या मागे असलेल्या रेल्वे पुलाजवळ काहीजण दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.

तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. भोजराज ऊर्फ वसीम खान तिजाऊ  सरपा (१९) रा. भैसरा ता. डोंगरगढ जि. राजनांदगाव, छत्तीसगढ, वैभव सतीश दुबे (२२) रा. प्रिती सोसायटी, ओमनगर, कोराडी आणि सिमोन सोनू गॅब्रिएल (१९) रा. संतोषीमाता वॉर्ड, हनुमान मंदिराजवळ, बल्लारशहा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची

नावे आहेत. त्यांचे साथिदार आरोपी सिमोन नेल्सन, ओम ऊर्फ लल्ला आणि नीलेश ऊर्फ लंघडी रा. उमंग किराणा स्टोर्सजवळ, शंभुनगर, कोराडी नागपूर हे अंधाराचा फायदा घेऊ न पळून जाण्यात यशस्वी झाले.