अटल आरोग्य महाशिबिरात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्याने महात्मा फुले जनआरोग्य योजना तर केंद्राने आयुष्यमान भारत योजनेद्वारे गरिबांना नि:शुल्क उपचाराची सोय केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून आजपर्यंत उपचारासाठी ५०० कोटींची मदत केली गेली आहे. त्यामुळे आता उपचारासाठी कुणालाही वंचित रहावे लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्र शासन व स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेच्या वतीने रेशीमबाग मैदानावर मध्य नागपूरच्या नागरिकांसाठी आयोजित अटल आरोग्य महाशिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते  बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते.

मुख्यमंत्री म्हणाले, आजारावरील लाखो रुपयांचा खर्च सामान्यांपुढील एक समस्या आहे. म्हणूनच केंद्र व राज्य शासनाच्या जन आरोग्य योजनांनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनांमध्ये न बसणाऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामधून विविध आजारांवरील उपचार व शस्त्रक्रियांसाठी एकटय़ा नागपुरात ४० कोटी तर राज्यात ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत केली गेली आहे.

अटल आरोग्य शिबिराच्या आयोजनामागची भावना रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देणे हीच आहे. या शिबिरापूर्वी उभारण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या बाह्य़रुग्ण विभागात रुग्णांवर आजाराचे निदान झाले असून, आता विविध आजारांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येतील.

वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. गिरीश महाजन म्हणाले, शिबिरात निदान झालेल्या पण गुंतागुंतीच्या, कठीण शस्त्रक्रिया पुणे, मुंबई आणि नागपुरातील अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त रुग्णालयात केल्या जातील. त्यासाठी राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर विनामूल्य सेवा देत आहेत. या शिबिराचे आयोजन व उपचारासाठीचा खर्च उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीसह इतर देणगी दाते उचलत आहेत.

प्रास्ताविक प्रवीण दटके यांनी केले, तर आभार विनोद राऊत यांनी मानले. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जि. प. अध्यक्ष निशा सावरकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, आ. डॉ. परिणय  फुके, माजी खासदार अजय संचेती आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रामेश्वर नाईक आणि चमूने प्रयत्न केले.