देवेंद्र गावंडे

स्वातंत्र्य मिळून सात दशके लोटली तरी ब्रिटिश किंवा परकीय परंपरा पाळण्याचा आपला मोह काही सुटत नाही. काहीजण या परंपरा पाळणे म्हणजे गुलामगिरीची मानसिकता जोपासणे होय, असे म्हणतात तर काहींची मते याहून भिन्न आहेत. उच्च अभिरूचीच्या नावावर आजही देशात अनेक ठिकाणी अशा परंपरा पाळल्या जातात. एखादी ब्रिटिशकालीन परंपरा चांगली असेल सुद्धा, पण स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांत आपल्याला स्वत:च्या परंपरा का निर्माण करता आल्या नाहीत, हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. या परंपरांची आठवण येण्यासाठी निमित्त ठरले आहे ती विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी संस्थेत नुकतीच घडलेली एक घटना. यंदापासून या संस्थेने दीक्षांत समारंभात ब्रिटिश परंपरेला फाटा देण्याचे ठरवले. पदवीदान सोहळ्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी परकीय संस्कृतीशी नाते जोडणारा काळा झगा व काळी टोपी न घालता उत्तरीये (स्कार्फ) घालावा, असा निर्णय या संस्थेने घेतला. अनेकांनी त्याचे स्वागत केले, पण हा निर्णय अनेक प्रश्न उपस्थित करणारा व विदर्भाच्या शैक्षणिक इतिहासाचे पुनरावलोकन करण्यास भाग पाडणारा आहे. सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नागपूर विद्यापीठात ही ब्रिटिश परंपरा हद्दपार होऊन पन्नासपेक्षा जास्त वर्षे लोटली आहेत, याची आज अनेकांना कल्पना नसेल. या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवी घेताना विद्यार्थ्यांला उत्तरीयेच परिधान करावी लागतात. या विद्यापीठात जुनी परंपरा मोडीत काढत ही नवी पद्धत सुरू केली वि.भि. कोलते यांनी! त्यांना हा बदल घडवून आणताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मुळात कोलते हे राज्यशासनाकडून नियुक्त झालेले विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्याआधी या पदासाठी निवडणुका व्हायच्या व त्यात अभिजनच निवडून यायचे, कारण शिक्षण क्षेत्रावर त्यांचेच वर्चस्व होते. ही नियुक्ती होण्याआधी कोलतेंना सुद्धा या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले होते. ही सल मनात न ठेवता कुलगुरू म्हणून उत्तम कामगिरी बजावणाऱ्या कोलतेंनी काळे झगे व काळी टोपी हा विद्यार्थ्यांचा गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला. साहजिकच अभिजनांच्या वर्गात त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. काळ्या टोपीवर व ब्रिटिश सैन्याच्या चालीरीतीवर प्रेम करत हिंदुत्वाचा हुंकार देणाऱ्या अनेकांनी या निर्णयाला विरोध केला. त्यासाठी विद्यार्थ्यांना पुढे करण्यात आले. नुटाचे प्राध्यापक सुद्धा वेगवेगळी कारणे समोर करून आंदोलनात उतरले. तरीही कोलते बधले नाहीत. विद्यार्थ्यांच्या घोषणा, नारेबाजी व एकूणच गदारोळात हा दीक्षांत समारंभ २० जानेवारी १९६८ ला पार पडला. हा रंजक इतिहास खुद्द कोलतेंनी त्यांच्या ‘अजुनी चालतो वाट’ या आत्मचरित्रात लिहून ठेवला आहे. गंमत म्हणजे, हे चरित्र खुद्द विद्यापीठाने प्रकाशित केले आहे. त्याच्या असंख्य प्रती विद्यापीठाच्या प्रकाशन विभागात आजही धूळखात पडल्या आहेत. कोलतेंनी ही उत्तरीये वापरण्याची पद्धत जेव्हा सुरू केली तेव्हा विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी ही संस्था नव्हते, तर महाविद्यालय होते व नागपूर विद्यापीठाशी संलग्न होते. त्यामुळे कोलतेंचा निर्णय आपसूकच या महाविद्यालयाला सुद्धा लागू झाला. १९६० ला स्थापन झालेले हे महाविद्यालय २६ जून २००२ मध्ये स्वायत्त झाले. त्याला संस्थेचा दर्जा मिळेपर्यंत म्हणजे जवळजवळ तीन दशके येथील अभियांत्रिकीचे विद्यार्थी पदवी घेताना उत्तरीयेच परिधान करीत होते. मग स्वायत्तता मिळाल्यावर या संस्थेत पुन्हा ब्रिटिश परंपरा कुणी आणली? ती आणण्यामागील धोरण काय होते? अशा प्रश्नांची उत्तरे सुद्धा आता या संस्थेने देणे अपेक्षित आहे. स्वायत्तता मिळाल्यानंतरची बरीच वर्षे या संस्थेवर एका विशिष्ट विचाराचा पगडा कायम होता. त्या विचाराच्या लोकांनी या ब्रिटिश परंपरेला पुन्हा जवळ केले असण्याची शक्यता जास्त आहे. संस्थेच्या सध्याच्या व्यवस्थापनाला हा जुना इतिहास आज उगाळण्याची कदाचित गरज वाटत नसेल पण यानिमित्ताने या संस्थेवर वर्चस्व ठेवून असणाऱ्या विशिष्ट विचारांचा विदेशीकडून देशीकडे झालेला हा प्रवास बरेच काही सांगून जाणारा आहे. देशीवादाचा पुरस्कार करणारे सध्याचे वातावरण सुद्धा या बदलाला कारणीभूत असावे. कोलतेंनी विद्यापीठ प्रशासनात मराठीचा आग्रह धरला होता. त्यांनी पदव्यांची नावे मराठीत केली. पदवी पत्राचा मजकूर इंग्रजीसोबत मराठीत केला. त्यालाही अनेकांनी विरोध केला. तेव्हा विदर्भ नुकताच महाराष्ट्रात सामील झाला होता व या भागात हिंदी भाषिकांचे वर्चस्व कायम होते, तरीही कोलते डगमगले नाहीत. जिथे आवश्यक असेल तिथेच इंग्रजीचा वापर करा, अन्यथा मराठीला प्रोत्साहन देण्याचे धोरण ठेवा, हे त्यांचे सांगणे या विद्यापीठाने ते पदावर असेपर्यंत  ऐकले. नंतर हळूहळू त्याचे प्रमाण कमी होत गेले. राज्याशी संलग्न असलेल्या विद्यापीठात मराठीचा वापर वाढावा म्हणून राज्य शासनाने विद्यापीठ कायद्यात तसे कलम नमूूद केले. तरीही विद्यापीठावर परकीयपणाची छाप कायम राहिली. आजही याच नाही तर बहुतेक सर्व विद्यापीठाचे कुलगुरू कोट, टाय याच वेशात कायम वावरत असतात. ऊन, वारा, थंडी, पाऊस असे कुठलेही वातावरण असो, या कुलगुरूंचा वेश कधी बदलत नाही. या वेशात असतो तोच विद्वान, बाकीचे सगळे ‘ढ’ अशी काहीशी भूमिका यामागे आहे की काय, अशी शंका अनेकांना अनेकदा येते. कोट व टाय घालून वावरणे ही पद्धत किमान भारतात तरी इंग्रजांनी रुजवली. आज जगभरात हा पेहराव सर्वमान्य ठरला आहे हे खरे पण यातून औपचारिकपणाचा परकीय गंध जाणवतो हे देखील तेवढेच खरे आहे. हे कुलगुरूवंशीय लोक रात्री झोपताना सुद्धा याच पेहरावात असतात की काय, असे अनेकदा चेष्टेने म्हटले जाते. खरे तर विद्वत्तेचा व पोशाखाचा काही एक संबंध नसतो. परदेशी शिकून भारतीय स्वातंत्र्यलढय़ात मोलाचे योगदान देणाऱ्या अनेक नेत्यांनी त्यांचे पेहराव भारतीयच ठेवले होते. उत्सव, समारंभापुरता हा पेहराव ठीक पण रोजच्या दैनंदिन कामकाजात तो ब्रिटिश परंपरेचीच आठवण करून देणाराच वाटतो, हे या ज्ञातीवंतांना कोण सांगणार? गेल्या सत्तर वर्षांत भारतीय शिक्षण क्षेत्राने खास देशी परंपरा रुजवायला हव्या होत्या. ते काम फारसे झाले नाही. त्यामुळे अजूनही कुणी ब्रिटिश परंपरा त्यागली की त्याची दखल घ्यावी लागणे, न त्यागणाऱ्यांना त्याची आठवण करून द्यावी लागणे ब्रिटिशांचा आपल्यावरील पगडा किती खोलवर दडला आहे, हेच दर्शवणारे आहे. त्या तुलनेत पन्नास वर्षांपूर्वीचे वि.भि. कोलते कितीतरी द्रष्टे ठरतात.

Devendra. gawande@expressindia.com