नागपूरच्या बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर टीका केली तर मुख्यमंत्री नाराज होतात, नागपूरवर आमचेही प्रेम आहे, पण येथील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती रसातळाला गेली आहे, ही वस्तुस्थिती आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

नागपूर क्राईम कॅपिटल झाले आहे, मात्र असे म्हटले तर मुख्यमंत्री नाराज होतात. नागपूरला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे असे ते म्हणतात, पण वास्तविकतेत येथील कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. चार वर्षे गृहखात्याचा कारभार सांभाळूनही मुख्यमंत्र्यांना त्यांच्या गृह शहरातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करता आला नाही, हे दुर्दैव आहे.

नागपूरच नव्हे तर राज्यातही अशीच अवस्था आहे. धुळे जिल्ह्य़ात लोकांनी कायदा हाती घेऊन पाच जणांची हत्या केली, नगरमध्ये दोघांची हत्या झाली. औरंगाबादमध्ये दंगल पेटली.  महाराष्ट्र बँकेच्या मराठे यांना अटक होते व याची माहिती मुख्यमंत्र्यांना नसते. त्यामुळे हे राज्य नेमके चालवतय कोण, असा प्रश्न पडतो असे मुंडे म्हणाले.

सहकार मंत्र्यांना सात गुन्हे माफ

राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सार्वजनिक उपयोगासाठी असलेल्या जमिनीवर बंगला बांधला,  तरीही ते मंत्री म्हणून कायम आहेत. नोटाबंदीच्या काळात याच देशमुखांच्या संबंधित संस्थेची रोख सापडली होती, तूर खरेदीतही त्यांचा हस्तक्षेप होता, त्यांच्या सात गुन्ह्य़ांबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांना माफ केले आहे, असा आरोपही मुंडे यांनी केला.

तूर खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना आव्हान

ऑनलाईन तूर खरेदीवरून मुंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले. सरकारने ऑनलाईन खरेदीची घोषणा केली, मात्र अधिकाऱ्यांना पासवर्डच दिले नाही. त्यामुळे खरेदी सुरू होऊ शकली नाही, परिणामी शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने त्यांची तूर व्यापाऱ्यांना विकावी लागली व व्यापाऱ्यांनी हीच तूर सरकारला विकली, हा आरोप खोटा असेल तर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील आकडेवारी जाहीर करावी, असे मुंडे म्हणाले

राज्यावर कर्जाचा डोंगर

राज्य कर्जबाजारी झाले असून पाच लाख कोटीचे कर्ज झाले आहे. यापैकी किती विकासावर किती खर्च झाला, हे सरकारने जाहीर करावे. दुष्काळाच्या नावावर कर गोळा करण्यात आला. मात्र, त्यातून एक रुपयाही शेतकऱ्यांसाठी खर्च करण्यात आला नाही, असा आरोप, मुंडे यांनी केला.