शासकीय रुग्णालयांत रुग्णांच्या जीवाशी खेळ

महेश बोकडे, नागपूर</strong>

सार्वजनिक आरोग्य खात्याने मे – २०१९ मध्ये शासकीय रुग्णालयांतील सर्व रुग्णांना गरजेनुसार आहाराबाबतचे स्वतंत्र धोरण तयार केले. प्रथिनांची गरज असलेल्या रुग्णांसाठी मांसाहारचाही त्यात समावेश होता. परंतु मुख्यमंत्र्यांच्या शहरातील डागा, प्रादेशिक मनोरुग्णालये अद्यापही मांसाहारी पदार्थापासून दूर असून हे धोरण कागदावरच असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

वैद्यकीय शास्त्रानुसार मानसिक आजाराच्या रुग्णांसह प्रथिनांची गरज असलेल्या रुग्णाला मांसाहाराची गरज असते. उपचारादरम्यान हा आहार या रुग्णांना नित्याने दिल्यास तो लवकर बरा होण्यास मदत होते. शासकीय रुग्णालयांत पूर्वी हाआहार उपलब्ध होता. परंतु विविध कारणे पुढे करत काही वर्षांपूर्वी या आहाराला कात्री लावण्यात आल्याचा प्रकार लोकसत्ताने पुढे आणला होता. त्यानंतर आरोग्य खात्याने रुग्णांच्या आहाराबाबत मे- २०१९ मध्ये स्वतंत्र धोरण जाहीर केले. त्यात शासकीय रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या शिशूंपासून वृद्धांपर्यंत कुणाला किती आणि कोणता आहार द्यावा, याबाबत निकष निश्चित झाले.

साडेतीन महिन्यानंनर तरी डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालयांत या धोरणाची अंमलबजावणी अपेक्षित होती, परंतु दोन्ही रुग्णालयांत मांसाहार सोडा अंडीही उपलब्ध करण्यात आलेली नाही. प्रादेशिक मनोरुग्णालयांत डॉक्टरांनी अंडी अत्यावश्यक केलेल्या निवडक रुग्णांनाच ती दिली जातात.  दरम्यान, रुग्णालय प्रशासनाकडून मात्र रुग्णांना शाकाहारी गटात आवश्यक प्रथिनेयुक्त अन्न दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

धोरणाचा अभ्यास करून तातडीने प्रादेशिक मनोरुग्णालयांत मांसाहार सुरू करण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर केला जाईल. त्याला मंजुरी मिळताच दरपत्र निश्चित केले जातील. सध्या येथे काही रुग्णांना अंडी दिली जात आहेत.’’

– डॉ. माधूरी थोरात, वैद्यकीय अधिक्षीका, प्रादेशिक मनोरुग्णालय.

डागा रुग्णालयांत रुग्णांना अंडीसह मांसाहार गटातील अन्न दिले जात नसले तरी प्रथिनेयुक्त चांगल्या दर्जाचे अन्न उपलब्ध केले जात आहे. वरिष्ठांच्या सुचना आल्यास इतरही अन्न उपलब्ध केले जाईल.

– डॉ. सीमा पारवेकर, वैद्यकीय अधीक्षक, डागा रुग्णालय.

डागात पंधरा हजार महिलांची प्रसूती

शहरातील सर्वाधिक १५ हजारांवर प्रसूती डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयांत होतात. प्रौढ, गर्भवती आणि गरोदर महिलांना तृणधान्य, गहूपीठ, तांदूळ, ब्रेड, पोहे, रवा, सोजी, डाळ, उसळ, भाज्या, हिरवी पालेभाजी, कंद भाजी, हंगामी फळे, दूध, साखर, गूळ, खाद्यतेल, मसाला साहित्य, अंडी, उसळ, प्रथिने व उष्मांक असलेले पदार्थ वैद्यकीय सल्ल्यानुसार तर ७५ ग्रॅम मांस, मासे, अंडी आठवडय़ातून दोन वेळा दुपारच्या जेवणात डाळी ऐवजी देता येत असल्याचे धोरणात सांगण्यात आले आहे. परंतु येथे महिलांना मांस, अंडी मिळत नाहीत.

कर्करुग्ण, जळीत, मनोरुग्णांना अंडी लाभदायक

कर्करुग्ण आणि जळीत रुग्ण मांसाहार घेणारे असतील तर  त्यांना दूध,अंडी, पपई, केळाचा गर, गहू, साखर, कडधान्ये, फळभाज्या, तेल आवश्यक आहे.  हलक्या आणि संपूर्ण आहारात शेंगदाणे, गुळाचे लाडू, मनोरुग्णांना तृणधान्य, हिरव्या पालेभाज्यांसह मांसाहार, अंडीही फायद्याचे असल्याचे धोरणत नमुद आहे. परंतु हे धोरण कागदावरच आहे.