राजेश्वर ठाकरे

नागपूर विमानतळावरील गो-एअर या विमान कंपनीला सेवा देणाऱ्या खासगी कंपनीतील १०८ युवकांवर बरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता व्हॉट्सअ‍ॅपवर ‘टर्मिनेशन लेटर’ पाठवण्यात आले आहे.

टाळेबंदीनंतर नागपूर विमानतळावर विमानसेवा सुरू झाली. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून सेवा देत असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यात आले नाही. गुवाहाटी येथे मुख्यालय असलेल्या जॉनस एव्हिएशन प्रा.लि.ने नागपूर विमानतळावर गो-एअर एअरलाईन्सला मनुष्यबळ पुरवले. प्रारंभी १०८ कर्मचारी होते. नागपूर ते बंगळुरू रात्रीचे उड्डाण रद्द झाल्यानंतर मार्च प्रारंभी २० कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. मार्च अखेर टाळेबंदी लागली. उर्वरित ८८ कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले. जॉनस एव्हिशनने कर्मचाऱ्यांना एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन दिले नाही. आता कर्मचाऱ्यांना ज्या दिवशीपासून टाळेबंदीमुळे विमानसेवा बंद झाली. त्यादिवशीपासून कामावरून काढल्याची नोटीस व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आली. नियमानुसार दोन महिन्यांपूर्वी नोटीस देणे आवश्यक आहे किंवा दोन महिन्यांचे आगाऊ वेतन देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करता येते. परंतु येथे दोन महिने सहा दिवसांचे वेतन कापण्यात आले आणि कोणतीही आगाऊ सूचना न देता थेट नोकरीवरून काढण्यात आले.

हे कर्मचारी विमानाच्या आतील स्वच्छता, टर्मिनलपासून विमान पोहचवणारी बस सेवा, विमानातून प्रवाशांना उतरण्यासाठी लागणाऱ्या शिडीची व्यवस्था करणे, आदी कामे ते करीत होते. जॉनस एव्हिशन देशभरात वेगवेगळ्या विमान कंपन्यांना मनुष्यबळ पुरवत असते. त्यांचा गो-एअरशी करार संपला आहे. एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमि. (एआयएटीएसएएल)ला नागपुरात गो-एअरचे काम मिळाले आहे. आतापर्यंत मनुष्यबळ पुरवणारी कंपनी बदलली तरी नागपूर विमानतळावर काम करणारे कर्मचारी  तेच राहायचे. परंतु आता १०८ पैकी एकाही युवकाला एआयएटीएसएएलने कामावर घेतलेले नाही. यासंदर्भात जॉनस एअर एव्हिशन प्रा. लि.शी ई-मेलद्वारे संपर्क साधला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

कामाचा दीर्घ अनुभव

जॉनस एव्हिशनला गोएअरचे काम मिळण्यापूर्वी नागपूर विमानतळावर हे युवक वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून काम करीत होते. यातील ३० युवकांना पाच वर्षांपेक्षा जास्त काळ कामाचा अनुभव आहे. या युवकांना इतर कंपन्यांनी सामावून घ्यावे, अशी मागणी आहे.

‘‘जॉनस एव्हिएशनचे गोएअरशी  कराराची मुदत संपली आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीने कमी केले आहे.’’

– धीरज महातो, व्यवस्थापक, जॉनस एव्हिशन प्रा.लि.