• मेडिकल- मेयोत केवळ दहा रुग्णांची नोंद
  •  पावसामुळे शहरात प्रदूषणाचा स्तर कमी

उपराजधानीत ऐन दिवाळीच्या दिवशी रविवारी ठराविक अंतराने चांगलाच पाऊस झाला. त्यामुळे फटाके कमी फुटल्याने गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मेडिकल, मेयोत कमी म्हणजे केवळ दहाच रुग्ण नोंदवले गेले. दिवाळीत पावसामुळे शहरात प्रदूषणाचा स्तरही दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या कमी असल्याचे चित्र होते.

दिवाळीत उपराजधानीतील सगळ्याच भागात मोठय़ा प्रमाणात नागरिकांकडून फटाक्यांची आतषबाजी केली जाते. यंदाही हे चित्र कायम राहण्याची शक्यता शुक्रवापर्यंत होती. परंतु शनिवारी शहराच्या काही भागात सायंकाळी चांगला पाऊस पडला. हवामान खात्याने दिवाळीत पावसाची शक्यता आधीच वर्तवली  होती. त्यानुसार रविवारी सायंकाळपासून पाऊस पडल्यामुळे अनेक सखल भागातील रस्ते, रस्त्यांवरील खड्डे, मोकळ्या जागांवर पाणी साचल्याचे चित्र होते. त्यामुळे निवडक ठिकाणीच पावसाने उसंत दिल्यावर फटाके फोडण्यात आले.शहरात रविवारी रात्री उशिरा आणि पहाटेपर्यंत चांगलाच पाऊस पडला. त्यामुळे फटाक्यांमुळे हवेत मिसळलेले कार्बन मँगनीज, सल्फर आणि अन्य रसायन पाण्यात मिश्रित होऊन शहरातील हवेतील प्रदूषणाचा स्तर सोमवारी कमी असल्याचे चित्र होते. त्यामुळे प्रत्येक दिवाळीत नागरिकांना श्वास घेताना होणारा त्रास यंदा कमी असल्याचे चित्र होते. दरम्यान, फटाके कमी फुटल्याने डोळ्यात त्याचे सूक्ष्म कण गेल्याने जळजळ होणे, होरपळण्यासह इतर कारणांनी दरवर्षी मेडिकल- मेयोत नोंदवले जाणाऱ्या शंभरावर रुग्णांची संख्या यंदा केवळ दहावर आली आहे, तर दरवर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत यंदा खासगी रुग्णालयांतही फटाक्यामुळे इजा झालेले रुग्ण कमी असल्याचे वास्तव आहे.

(‘दिवाळी पहाट’मध्ये विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू) : – रेशीमबागेतील महापालिकेच्या उद्यानात सोमवारी कला संगम कला संस्कृती मंडळातर्फे ‘दिवाळी पहाट वारा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमापूर्वीच पंकज सातपुते याचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. दिवाळीच्या दिवशी घरातील कर्ता पुरुष दगावल्याने सातपुते कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पंकज सातपुते (३१) त्रिमूर्तीनगर परिसरात राहतो.  त्याला आई, पत्नीसह एक लहान मुलगा आहे. त्याचे लग्न दीड वर्षांपूर्वीच झाले होते. तो लहान असताना त्याचे वडील दगावले होते. पंकज पहाटे वर्तमानपत्रे वितरणाचे काम करतो, तर त्याचा डीजे आणि एलएडी वॉल भाडय़ाने देण्याचा व्यवसाय आहे. रेशीमबाग येथील महापालिकेच्या उद्यानात त्याला डीजे आणि एलएडी वॉल उभारणीचे दोन दिवसांचे कंत्राट कला संगम संस्थेकडून मिळाले होते. त्यानुसार रविवारी येथे दिवाळी पहाटचा पहिल्या दिवशीचा कार्यक्रम यशस्वी झाला. सोमवारी दुसऱ्या दिवशीही येथे कीर्तनासह गीत सादर केले जाणार होते.

या गायकांचे एलएडी वॉलवर सादरीकरण होणार होते. दरम्यान, शहरात रविवारी दिवसा आणि रात्रीही चांगला पाऊस झाला. त्यामुळे सोमवारच्या कार्यक्रमात वीज यंत्रणेशी संबंधित यंत्रांमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून तो सकाळी कार्यक्रमस्थळी पोहचला. त्याने एलएडी वॉलवर पावसापासून वाचण्यासाठी टाकलेली प्लास्टिकची चादर दूर करण्यासाठी लोखंडी शिडी लावून प्रयत्न सुरू केले. तो शिडीवर चढून चादर हटवत असतानाच तेथील एका विजेच्या तारेला ओल्या प्लास्टिकच्या चादरेचा स्पर्श होऊन त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे तो खाली पडला. त्यानंतर त्याला उलटय़ा होऊन तो तडफडू लागला. हा प्रकार बघून खळबळ उडाली. लोकांनी तातडीने त्याला जवळच्या डॉ. गिल्लुरकर यांच्या रुग्णालयात हलवले. मात्र त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेमुळे कार्यक्रमही रद्द करण्यात आला. पंकज सातपुते काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांचे नातेवाईक आहेत.

वीज यंत्रणेची परवानगीच नाही

पोलिसांकडून महावितरणला विचारणा केली असता आयोजकांनी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमासाठी वीज कंपनीची रितसर परवानगी घेतली नसल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे, तर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणात येथील महापालिकेला मिळालेल्या वीज मूटरच्या पेटीचे कुलूप तोडून त्यातून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे पुढे आले आहे. प्रफुल्ल गुडधे यांच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कला संगम कला संस्कृती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तर शवविच्छेदन अहवालात या मृत्यूला विजेचा धक्काच जबाबदार असल्याचे पुढे आले आहे.